छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगर शहरात 5 ठिकाणी स्मार्ट टॉयलेट्स ! दहा वेळेस वापर झाल्यानंतर सिस्टीमद्वारे आपोआप होणार स्वच्छता !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ६: महानगरपालिका व स्मार्ट सिटी ह्यांचा खाजगी संस्थांसोबत समन्वयाने शहरात 5 ठिकाणी स्मार्ट टॉयलेट्स उभे करण्यात येत आहे. हे सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे.

खाजगी सहभागाद्वारे शहराचा सौंदर्यात भर पडावी आणि सार्वजनिक सुविधा सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत विशेष पथक नेमण्यात आले आहे. स्मार्ट सिटी चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, आदित्य तिवारी आणि अर्पिता शरद ह्यांचा समावेश असलेले हे पथक खाजगी संस्थांचा मदतीने सी एस आर अंतर्गत शहरात सौंदर्यीकरण व सुविधा सुधारण्यासाठी समन्वयातून काम करत आहेत.

याच उपक्रमांतर्गत आय सी आय सी आय बँकेकडून शहर अभियंता ए बी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 5 ठिकाणी स्मार्ट टॉयलेट्स उभारण्याचे काम घेण्यात आले. सौरभ जोशी यांनी सांगितले की, औरंगाबाद लेण्या, सोनेरी महल, सिध्दार्थ गार्डन प्राणी संग्रहालय, नेहरू गार्डन व छावणी येथे स्मार्ट टॉयलेट्स बसवण्यात येत आहे. काही ठिकाणी काम पूर्ण झाले असून तिथे सार्वजनिक शौचालय कार्यान्वित झाले आहे. स्मार्ट टॉयलेट्स स्टीलचे बनलेले आहेत आणि यामध्येमध्ये महिला व पुरुषांसाठी एक एक ब्लॉक देण्यात आला आहे.

10 वेळेस वापर झाल्यानंतर स्मार्ट टॉयलेट्स मध्ये असलेल्या सिस्टीमद्वारे आपोआप स्वच्छता होत असल्यामुळे याचे नाव स्मार्ट टॉयलेट्स देण्यात आले आहे. यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त आणि स्मार्ट सिटी सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी शहरातील बँक अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन शहरात मनपा प्रशासनाला सी एस आर अंतर्गत मदत करण्यासाठी आवाहन केले होते.

आय सी आय सी आय बँकेकडून अक्षय कुलकर्णी व गौरव शिंगोटे हे स्मार्ट टॉयलेट्स बसवण्यासाठी समन्वय साधत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!