छत्रपती संभाजीनगर
Trending

मार्च एंडसाठी उरले फक्त दहा दिवस, थकीत वीजबिल भरा अन्यथा कनेक्शन कट करून होईल बत्ती गूल !

चालू वीजबिलासह थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ : आर्थिक वर्ष संपण्यास केवळ दहा दिवसांचा कालावधी उरला असतानाही महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीतील 3 लाख 79 हजार 546 ग्राहकांकडे 650 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे बिल वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी संबंधित वीज ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

थकबाकी वसुलीसाठी क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी वसुलीच्या कामात व्यग्र आहेत. वीजबिल भरण्याची मुदत संपलेल्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील 3 लाख 79 हजार 546 ग्राहकांकडे 650 कोटी 22 लाख रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. शहर मंडलातील 1 लाख 13 हजार 174 ग्राहकांकडे 60 कोटी 24 लाख रुपयांची थकबाकी आहे.

ग्रामीण मंडलातील 1 लाख 58 हजार 748 ग्राहकांकडे 370 कोटी 51 लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. जालना मंडलातील 1 लाख 7 हजार 624 ग्राहकांकडे 219 कोटी 47 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी ‍वीजबिल भरणे आवश्यक आहे.

वीजबिल भरणा सोयीचा व्हावा यासाठी या महिन्यात सार्वजनिक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणची वेबसाइट, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॉलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगमार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करण्याचे आवाहन महावितरकडून करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!