गंगापूरछत्रपती संभाजीनगर
Trending

गंगापूरला होणार ४३वे मराठवाडा साहित्य संमेलन, श्रीमुक्तानंद महाविद्यालयास आयोजनाचा बहुमान !!

स्वागताध्यक्षपदी माजी आ. लक्ष्मणराव मनाळ तर आ.सतीश चव्हाण मार्गदर्शकाच्या भूमिकेत

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७- मराठवाडा साहित्य परिषदेचे ४३ वे मराठवाडा साहित्य संमेलन २ व ३ डिसेंबर २०२३ रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गंगापूर येथील श्रीमुक्तानंद महाविद्यालयात होणार असून संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी गंगापूर मतदारसंघाचे माजी आमदार तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य लक्ष्मणराव मनाळ यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती आ.सतीश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मराठवाडा साहित्य परिषद मराठवाडा प्रदेश हैद्राबाद संस्थानात असताना स्थापन झालेली संस्था आहे. मराठी भाषकांच्या अस्मितेचा आवाज बुलंद करण्याचे कार्य ती त्या काळापासून करीत आली आहे. जुलमी राजवटीतून सुटका झालेल्या मराठीच्या या आद्यभूमीला वाड्मयीन, सांस्कृतिक, वैचारिक पातळीवर संस्थात्मक चेहरा देण्याचे कार्य तिने केले आहे. परिषदेचे आजपर्यंत मराठवाड्यात बेचाळीस साहित्य संमेलने झाली आहेत. या संमेलनांची एक उज्ज्वल परंपरा निर्माण झाली आहे. या परंपरेतील ४३ वे साहित्य संमेलन आयोजित करण्याची संधी साहित्य परिषदेने आम्हाला दिली असल्याचे सांगत आ.सतीश चव्हाण यांनी परिषदेचे आभार मानले.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे संमेलन घेण्यात येणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा बहुमान आ.सतीश चव्हाण यांनी गंगापूर मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मणराव मनाळ यांना दिला आहे. मनाळ हे १९७२ मध्ये विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यानंतर १९७८च्या निवडणुकीत गंगापूर विधानसभा मतदारसंघातून देखील त्यांनी विजय संपादन केला होता. व्यवसायाने वकील असणारे माजी आ. मनाळ हे सामाजिक, राजकीय जीवनात कायमच प्रागतिक विचारांचा वारसा घेऊन सक्रिय असून श्रीमुक्तानंद महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे देखील ते सदस्य आहेत.

या संमेलनाचे कार्यवाह म.शि.प्र. मंडळाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे जेष्ठ सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर,उपाध्यक्ष म्हणून गंगापूर शहराच्या माजी नगराध्यक्ष सुवर्णाताई जाधव,सहकार्यवाह म्हणून म.शि.प्र. मंडळाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ.प्रकाश भांडवलदार व गंगापूरचे सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रशांत माने, कोषाध्यक्षपदी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सी.एस.पाटील तर समन्वयक प्रा.डॉ.गणेश मोहिते आहेत. या स्वागतमंडळात गंगापूर शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांचा समावेश आहे.

स्वागतमंडळ पुढीलप्रमाणे- मार्गदर्शक- आ.सतीश चव्हाण, स्वागताध्यक्ष- माजी आ. लक्ष्मणराव मनाळ, कार्यवाह- त्रिंबकराव पाथ्रीकर, उपाध्यक्ष- सुवर्णाताई जाधव, सहकार्यवाह- डॉ.प्रकाश भांडवलदार, प्रशांत माने, कोषाध्यक्ष- प्राचार्य डॉ. सी.एस.पाटील तर समन्वयक डॉ.गणेश मोहिते आहेत. या संयोजन समितीचे एड.कृष्णा ठोंबरे, श्यामसुंदर धूत, मोहसीन चाऊस, रावसाहेब तोगे, मनीष वर्मा, सुधीर माने, संतोष अंबिलवादे, संदीप साबणे, बाळासाहेब लगड हे सदस्य आहेत.

गंगापूर येथे होणारे संमेलन हे मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यादृष्टीने हे साहित्य संमेलन भव्य-व्यापक व ऐतिहासिक कसे होईल या दृष्टीने स्वागतमंडळ प्रयत्न करणार आहे. गंगापूर शहरात असा सांस्कृतिक-वैचारिक सोहळा पहिल्यांदाच होत असल्याने तालुक्यातील साहित्यिक-सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यास तो उपयुक्त ठरेल असा आशावाद आ.सतीश चव्हाण यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

संमेलनाच्या बोध चिन्हाचे अनावरण देखील आज करण्यात आले. मराठवाडा साहित्य परिषदेने या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.जगदीश कदम यांची या पूर्वीच निवड केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!