महाराष्ट्र
Trending

सन २००१ पूर्वीच्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्या अनुदानाबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार !

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 27 : नक्षलग्रस्त भागातील उर्वरित महिला महाविद्यालय तसेच अल्पसंख्यांक, भूकंपग्रस्त, आदिवासी, डोंगराळ, सीमावर्ती भागातील महाविद्यालयांना सन २००१ पूर्वी कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यात आलेल्या कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, विद्या शाखा यांना अनुदान मंजूर करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.

सदस्य राजेश टोपे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री पाटील म्हणाले की, सन 2001 पूर्वीच्या 78 महाविद्यालयाबाबत सविस्तर प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला होता. त्यात काही त्रुटी आहेत असे वित्त विभागाने कळविले आहे. या त्रुटींची विभागाकडून तातडीने पूर्तता करून वित्त मंत्री यांच्याशी चर्चा करून या महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

नक्षलग्रस्त भागातील पात्र 14 महिला महाविद्यालयांना विशेष बाब म्हणून अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अकृषी विद्यापीठाची संलग्नित महाविद्यालयातील ज्या तालुक्यात एकही अनुदानित महाविद्यालय अथवा विद्या शाखा नाही, अशा प्रत्येक तालुक्यामध्ये एका महाविद्यालयास किंवा विद्याशाखेस 100 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!