महाराष्ट्र
Trending

निवासी आश्रमशाळांमधील 282 शिक्षकांची पदे भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता, भरती प्रक्रिया सुरू: मंत्री अतुल सावे

नागपूर, दि. 8 : राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण 977 खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागांत अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी 225 कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी आतापर्यंत 180 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या आश्रमशाळांमध्ये एकूण 2 लाख 23 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये विज्ञान आणि गणित विषय शिकविण्यासाठी 282 पदे भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य विकास ठाकरे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रिक्त पदे भरण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत मंत्री सावे म्हणाले की, सर्व आश्रमशाळांमधील रिक्त पदे त्वरीत भरण्यात येतील. येत्या जानेवारी पर्यंत राज्यात 52 वसतिगृहे सुरू करण्यात येणार असून मोठ्या शहरात भाडे अधिक असल्याने ते वाढवून मिळण्यास शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.

ती मान्य झाल्यानंतर या शहरांमध्ये देखील उर्वरित शाळा सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांसाठी आधार योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून 600 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या आता 50 वरून 75 इतकी वाढविण्यात आली असल्याचे सांगून आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे प्रदान करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. सदस्य बाळासाहेब थोरात यांनीही या अनुषंगाने चर्चेत सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!