छत्रपती संभाजीनगरपैठणफुलंब्री
Trending

फुलंब्री तालुक्यातील बाबऱ्याचा चोरटा जेरबंद, महिलांना लिफ्ट देण्याचा बहाना करून दागिने लुटायचा ! करमाड, चिकलठाणा, पाचोड, शिऊरसह जालना जिल्ह्यातही केला हात साफ !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ -पोलीस ठाणे चिकलठाणा व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वृध्द महिला हेरून जबरी चोरी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आला. महिलांना लिफ्ट देण्याचा बहाना करून चोरी करण्याचा त्याचा फंडा होता. करमाड, चिकलठाणा, फुलंब्री, पाचोड, शिऊरसह जालना जिल्ह्यातही त्याने चोरी केल्याच्या अनुषंगाने पोलिस त्याच्याकडे तपास करत आहे.

पोलीस स्टेशन चिकलठाणा येथे दिनांक 07/12/2022 रोजी फिर्यादी चंपाबाई धनसिंग बोहरा (वय 58 वर्षे, व्यवसाय घरकाम व शेती रा. हिरापुर ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी तक्रार दिली की, दिनांक 07/12/2022 रोजी 08.30 वाजता सुमारास त्या हिरापूर फाटा येथे आल्या असता त्यांना अनोळखी व्यक्तिने मी तुम्हाला सोडतो असे म्हणून मोटार सायकलवर लिफ्ट दिली. लिफ्ट देण्याचा बहाना करून नाथनगर येथील डोंगरात निर्जन ठिकाणी नेऊन चंपाबाई बोहरा यांच्या गळ्यातील कानातील 70,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावले. यामुळे त्यांच्या कानाला दुखापत झाली. त्यानंतर त्या भामट्याने जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी चिकलठाणा स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करित असतांना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रिक विश्लेषणा आधारे खात्रीलायक माहिती मिळाली की, हा गुन्हा राहुल कडुबा पवार (रा.बाबरा ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर) याने केला आहे. त्यावरुन त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राहुल कडूबा पवार (वय 30 वर्षे रा. बाबरा ता. फुलंब्री. जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले.

त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पोलीस ठाणे करमाड, चिकलठाणा, फुलंब्री, पाचोड, शिऊर येथे वृध्द महिलांना हेरून मोटार सायकलवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने व रस्त्यावर व शेत वस्तीवर एकांतात गाठून अशाच प्रकारच्या जबरी चोरीचे इतर १५ गुन्हे दाखल आहे, तसेच अशा प्रकारचे गुन्हे सदर आरोपीने जालना जिल्ह्यात देखील केले आहेत. त्यासंदर्भान्वये त्याच्याकडे विचारपुस चालू आहे.

आरोपीच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटार सायकल व मोबाइल हैंडसेट असा एकूण 60,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नमुद त्यास सदर गुन्हयाच्या पुढील तपासा कामी पोलीस ठाणे चिकलठाणा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास पोलीस ठाणे चिकलठाणा हे करीत आहे.

ही कामगिरी मनिष कलवानीया, पोलीस अधीक्षक, सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि प्रदिप ठुबे, पोह लहू थोटे, संजय घुगे, नदिम शेख, कासम शेख, मपोह जनाबाई राठोड, मनिषा चौधरी, पोना विजय धुमाळ, दीपक सुरोशे, अशोक वाघ, पोकों राहुल गायकवाड, ज्ञानेश्वर मेटे, आनंद घाटेश्वर, संजय तांदळे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, मपोकों कविता पवार, पदमा देवरे यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!