मिस्टर बेफिक्राच्या जाळ्यात अडकलेल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची पोलिसांनी अशी केली सुटका!
अमरावती, दि. १२ ः मिस्टर बेफिक्राच्या जाळ्यात अडकलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थिनीची अखेर अमरावती पोलिसांनी सुटका केली आहे. या बेफिक्रासाठी पोलिसांनीही मग जाळे फेकले अन् तो त्यात अलगद अडकला. त्याला पकडल्यानंतर खरी ओळखही त्याने सांगितली. प्रणय सुधाकर घुबडे (२१, रा. गांधीनगर, बल्लारपूर, जि. चंद्रपूर) अशी त्याची ओळख समोर आली. तो सोशल मीडियावर रोहन पाटील नावाने भलतेच कारनामे करत होता. सध्या तो राजापेठ पोलिसांच्या ताब्यात आहे.
पीडित मुलगी बडनेरा मार्गावरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकते. तिने ६ डिसेंबरला या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. मिस्टर बेफिक्ररा या बनावट आयडीने तो इन्स्टाग्रामवर अकाऊंट चालवत होता. या माध्यमातून पीडित मुलीची ओळख त्याच्यासोबत झाली. दोघांत चॅटिंग सुरू झाल्यानंतर मैत्री झाली. या मैत्रीतून त्याने प्रेमाचे आमिष दाखवत तिला न्यूड फोटो पाठवायला सांगितले.
तिने फोटो पाठवल्यानंतर त्याने तिला शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. याला तरुणीने नकार दिला. त्यामुळे न्यूड छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी त्याने तिला दिली. प्रकरण डोक्याबाहेर जात असल्याचे पाहून तिने घरच्यांना सांगितले. घरच्यांनी तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सायबर विभागाच्या पोलीस निरिक्षक सीमा दाताळकर यांच्याकडे सोपवले.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
पोलिसांनी त्याच्यासाठी जाळे फेकले. तरुणीकरवी त्याला अमरावतीला बोलावले. तो स्वप्ने रंगवत आला आणि राजापेठ पोलिसांनी लावलेल्या जाळ्यात अलगद अडकला. त्याला पकडल्यानंतर खरी ओळखही समोर आली. अशाप्रकारे त्याने किती मुलींना फसवले याची माहिती घेतली जात आहे.
सध्या तो राजापेठ पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की सोशल मीडियाद्वारे ओळख झालेल्यांसोबत सावधगिरी बाळगली पाहिजेत. खासगी चॅटिंग करताना खासगी क्षणांचे छायाचित्रे, व्हिडिओ पाठविण्याची चूक करू नये, असे त्या म्हणाल्या.