महाराष्ट्र
Trending

महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांसाठीच्या बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानामध्ये २५०० रुपयांपर्यंत वाढ !

मिशन वात्सल्य योजनेंतर्गत बालसंगोपन अनुदानात वाढ करणार: मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

नागपूरदि. २२ : राज्यात कोरोना कालावधित विधवा झालेल्या महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांसाठीच्या बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानामध्ये २ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असून येत्या तीन महिन्यांत सदरहू रक्कम वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली.

राज्यात मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत अनुदानात वाढ तसेच पंडिता रमाबाई व्याजमाफी योजना अंमलात आणण्याबाबत सदस्य ॲड.आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री श्री. लोढा बोलत होते.

मंत्री लोढा म्हणाले कीकोरोना संसर्गाने कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने विधवा महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांच्या संगोपनासाठी मिशन वात्सल्य योजना सुरु करण्यात येणार आहे. बालसंगोपन आणि महिलांच्या रोजगारासाठी पंडिता रमाबाई व्याजमाफी योजना अंमलात आणून या योजनेअंतर्गत मिळणारे सहायक अनुदान १ हजार १०० रुपयांवरून २ हजार ५०० करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. त्यानुसार ही योजना अंमलात आणण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.  

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

बालसंगोपन योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाबाबत वाढ करण्याच्या अनुषंगाने सर्व विभागांची सहमती मिळाली आहे. या योजनेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विभागाच्यावतीने राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये या योजनेबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विधवा महिलांचे बचत गट बनवून या गटांना १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार असून त्याचे व्याज शासनाच्या माध्यमातून अदा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

सध्या राज्यात कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यांचे आई-वडील मृत्यू पावले आहेत, अशी एकूण 847 प्रकरणे आहेत. तसेच माता किंवा पिता यांच्यापैकी एक मृत्यू पावले आहे अशी एकूण 23 हजार 533 प्रकरणे आहेत. एकूण 24 हजार 380 पैकी 1100 रुपये प्रमाणे 19 हजार प्रकरणात लाभ देण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे लवकरच निकाली काढण्यात येतील.

कोरोनात ज्यांनी माता किंवा पिता गमावले आहेत  त्यांच्यासाठी बचत गट स्थापन  करण्यात येणार आहेत. कोरोना काळात ज्याचे माता किंवा पिता यापैकी कोणी मृत्यू पावला असेल अशा परिवारातील ज्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे. त्यांच्या वरील व्याज कमी करण्याबाबत बँकेशी पत्रव्यवहार करण्यात येईल,  असेही त्यांनी यावेळी सांगितले. या चर्चेत सदस्य सर्वश्री राम कदम, संजय गायकवाड, मोहन मतेराम सातपुते यांनी सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!