झेडपी
Trending

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा पगार इतरत्र खर्च करणार्‍या अधिकार्‍यांवर उगारणार कारवाईचा बडगा !

आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे उत्तर

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २४- राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा पगार इतरत्र खर्च करणार्‍या संबंधित जिल्ह्यातील जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करणार असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज (दि.24) विधान परिषदेत सांगितले.

पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या पगारासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी आज विधान परिषदेत नियम 93 अन्वये सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. अनेक जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या पगारासाठी आलेला निधी इतर कामसाठी खर्च केला जातो.

त्यामुळे सदरील शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या शिक्षकांच्या पगारासाठी दिला जाणारा निधी इतरत्र खर्च न करता पगारासाठीच दिला जावा, व हा निधी इतर कामासाठी खर्च करणार्‍या त्या त्या जिल्ह्यातील जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली.

आ.सतीश चव्हाण यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे पगार वेळेवर झाले पाहिजे हे मान्य करत यापुढे सदरील शिक्षकांचे पगार डायरेक्ट त्यांना कसा मिळेल व तो निधी इतरत्र खर्च होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल असे सांगितले. ज्या जिल्ह्यात शिक्षकांच्या पगाराचा निधी इतर कामासाठी वळता केला त्या जिल्ह्यातील जबाबदार अधिकार्‍याची शिक्षण संचालनालयस्तरावर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे मंत्री महाजन यांनी सभागृहास आश्वस्त केले.

Back to top button
error: Content is protected !!