लिफ्टमध्ये अडकून १३ वर्षीय मुलाचा बळी ! कटकट गेट परिसरातील लिफ्टची सुरक्षितता चव्हाट्यावर, इमारतीचे मालक व लिफ्ट बसवणाऱ्यांवर गुन्हा दाखल !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – लिफ्टमध्ये अडकून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कटकट गेट परिसरातील इमारतीत घडली. या लिफ्टची सुरक्षितता चव्हाट्यावर आली असून मृत मुलाच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून इमारतीचे मालक व लिफ्ट बसवणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीब अहेमद (वय 13 वर्षे) असे मृताचे नाव आहे.
इमारतीचे मालक काजी सलीम मोहीयोद्दीन सिद्दीकी (वय 78 वर्षे रा. युनुस कलनी कटकट गेट छत्रपती संभाजीनगर) व लिफ्ट बसविणारे हितेश मधुकांत लाडाणी (वय 41 वर्षे, रा. शिवालय रेसिडेंसी, सोमनाथ नगर तरसाली, जि. वडोदरा, गुजरात) यांच्यावर जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहमद इरफान सिद्दीकी मोहंमद सदरोद्दीन सिद्दीकी (वय 42 वर्षे, व्यवसाय – खा. नोकरी, रा. बक्कलगुडा निशानच्या पाठीमागे, शाह बाजार छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते हैदराबाद येथील एका कंपनीत सिनियर इंजिनीयर म्हणून काम करतात. त्यांना एक मुलगा साकीब अहेमद (वय 13 वर्षे) व दोन मुली आहेत.
मोहमद इरफान सिद्दीकी मोहंमद सदरोद्दीन हे हैदराबाद येथील कंपनीत दिनांक 03/05/2023 पासून नोकरीस आहे. हैदराबादला त्यांचा मोठा भाऊ मोहंमद फैजुल मुस्तहसन सिद्दीकी हे राहत असल्याने मोहमद इरफान सिद्दीकी मोहंमद सदरोद्दीन हे व त्यांची पत्नी व मुलगी दिनांक 02/05/2023 रोजी हैदराबादला गेले होते. मुलगा साकीब अहेमद हा मोहमद इरफान सिद्दीकी मोहंमद सदरोद्दीन यांच्या आईसोबत घरी येथे सोडले होते. उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने आई, मुलगा साकीब व भाचा यांच्यासोबत दिनांक 11/05/2023 रोजी मामा यांच्या घरी कटकट गेट येथे राहण्यास होते. तेव्हापासून आई व मुलगा मामाच्या घरीच राहत होते.
दिनांक 14/05/2023 रोजी रात्री 10.30 वा. सुमारास मोहमद इरफान सिद्दीकी मोहंमद सदरोद्दीन हे त्यांचा मोठा भाऊ मोहमद फैजुल मुस्तहसन सिद्दीकी यांच्या हैदराबाद येथील घरात असताना लहान भाऊ मोहंमद इम्रान सिद्दीकी याने छत्रपती संभाजीनगर येथून फोन करुन सांगितले की, मामा सलीम सिद्दीकी यांच्या घराच्या लिफ्टमध्ये अडकून साकीबचा अक्सिडेंट झाला असून त्यास घाटी रुग्णालयात घेऊन चाललो आहोत. ही माहिती कळताच मोहमद इरफान सिद्दीकी मोहंमद सदरोद्दीन हे पत्नी व दोन्ही मुलींना घेवुन तात्काळ हैदराबादवरून खाजगी कारने निघाले व सकाळी 10.00 वाजता कटकट गेट येथील त्यांचे मामा सलीम सिद्दीकी यांच्या घरी पोहोचले.
घरी पोहोचल्यानंतर कळाले की, मुलगा साकीब अहेमद (वय 13 वर्षे) याचा लिफ्टमध्ये अडकल्याने मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह सद्या घाटी रुग्णालयात आहे. त्यावरून मोहमद इरफान सिद्दीकी मोहंमद सदरोद्दीन हे तात्काळ पत्नीसोबत घाटीत पोहोचले. तेव्हा त्यांच्या मुलाचे पोस्टमार्टम झाले होते. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात दिला. धार्मीक रितीरिवाजाने नूतन कॉलनी येथील छोटा तकीया कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार केले.
मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर मोहमद इरफान सिद्दीकी मोहंमद सदरोद्दीन यांनी सलीम मामा यांच्या इमारतीमधील लिफ्टची पाहणी केली. सदर लिफ्टही धोकादायक असून जीनाच्या चारही बाजुला लिफ्टला संरक्षण दिलेले नसून जीना व लिफ्ट उघडी आहे. तसेच ग्राऊंड फ्लोअरवर जेथे लिफ्ट समाप्त होवून टेकत असते तेथे कोणत्याही प्रकारचे स्प्रिंग किंवा शॉकअप बसवलेले नाही. सदर लिफ्ट बसवितांना योग्य ती सुरक्षिततेची काळजी घेतली गेली नसल्याचे दिसून आल्याचे मोहमद इरफान सिद्दीकी मोहंमद सदरोद्दीन यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
सदर लिफ्ट बसवितांना योग्य ती सुरक्षिततेची काळजी घेतली असती तर मुलाचा मृत्यू झाला नसता असेही मोहमद इरफान सिद्दीकी मोहंमद सदरोद्दीन यांनी म्हटले आहे. या फिर्यादीनुसार इमारतीचे मालक काजी सलीम मोहीयोद्दीन सिद्दीकी (वय 78 वर्षे रा. युनुस कलनी कटकट गेट छत्रपती संभाजीनगर) व लिफ्ट बसविणारे हितेश मधुकांत लाडाणी (वय 41 वर्षे, रा. शिवालय रेसिडेंसी, सोमनाथ नगर तरसाली, जि. वडोदरा, गुजरात) यांच्यावर जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe