आमदार नारायण कुचे यांच्या गाडीवरील चालकाची मुलगी बेपत्ता ! ज्ञानेश्वर विद्या मंदिर ते मुकुंदवाडी दरम्यान अपहरण झाल्याची शक्यता !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – बदनापूर मतदार संघाचे आमदार नारायण कुचे यांच्या गाडीवरील चालकाची १४ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली असून अपहरणाची शक्यता मुलीच्या वडीलांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ज्ञानेश्वर विद्या मंदिर शाळा एसटी कॉलनी ते मुकुंदवाडी दरम्यान ती बेपत्ता झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
किशोर रामहरी दांडेकर (वय 36 वर्षे, व्यवसाय चालक, रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) हे आमदार नारायण कुचे यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करतात. किशोर दांडेकर यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 20/10/2023 रोजी ते नेहमी प्रमाणे आमदार नारायण कुचे यांच्या गाडीवर कामावर होते. संध्याकाळी 08.30 वाजेच्या सुमारास दांडेकर यांना त्यांच्या पत्नीने फोन करुन कळविले की, “मुलीला शाळेत नवरात्र निमीत्त देवीची आरती असल्याने एस टी कॉलनी येथील तिच्या ज्ञानेश्वर विद्यामंदिर शाळेत संध्याकाळी 05.10 वाजेच्या सुमारास सोडून आले होते.
मात्र, मुलगी अद्याप पर्यंत घरी परतलेली नाही. असे पत्नीने फोनवर सांगितले. किशोर दांडेकर यांनी तत्काळ घर गाठले. मुलीच्या शाळेत गेले. देवीची आरती संपल्यामुळे शाळेत कोणीही नव्हते. व त्यांची मुलगी शाळेत दिसून आली नाही. मैत्रिणीकडेही तिची चौकशी केली. ती आमच्यासोबत शाळेत होती व शाळीतील देवीची आरती झाल्यानंतर एकविरा हॉस्पिटलपर्यंत ती मैत्रीणीसोबत आली होती. त्यानंतर घरी जाते असे सांगून एकविरा हॉस्पिटल परिसरातू गेली असे मैत्रिणीने सांगितले.
तिची आजुबाजुच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे विचारपूस करून शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तिचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहण केले असावे, अशा आशयाची फिर्याद तिचे वडील किशोर रामहरी दांडेकर यांनी मुकुंदवाडी पोलिसांत दिली आहे. यावरून पोलिसांनी बेपत्ता/अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनी समाधान वाठोरे करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe