महाराष्ट्र
Trending

विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीचे काम पूर्ण करा ! शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश !!

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Story Highlights
  • विभागातील विविध योजनांचाही घेतला आढावा

मुंबई, दि. 11 : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्येच कोरी पाने देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावर्षी घेतला आहे. याचा परिणाम जाणून घेताना आज त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचा अनुभव घेतला. त्याचप्रमाणे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत विविध योजनांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीचे काम पूर्ण होणे गरजेचे असून शाळेतील एकही विद्यार्थी अज्ञात राहता कामा नये असे केसरकर यांनी सांगितले. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी हे काम अत्यावश्यक असून ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

याप्रसंगी मंत्री केसरकर यांच्यासमवेत शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, उपसचिव समीर सावंत, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, मुंबई विभागीय उपसंचालक संदीप संगवे आदी उपस्थित होते. तर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच विभागीय आणि जिल्हा पातळीवरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी व्हावे यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यात आली आहेत. शाळेतच टिपण काढण्याच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सक्षमीकरणास मदत होत असल्याने यांचा उपयोग कसा करावा यादृष्टीने सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या पानांचा योग्य वापर होईल याची दक्षता शाळांनी घ्यावी.

विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीचे काम पूर्ण होणे गरजेचे असून शाळेतील एकही विद्यार्थी अज्ञात राहता कामा नये असे केसरकर यांनी सांगितले. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी हे काम अत्यावश्यक असून ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘रिड इंडिया’ उपक्रम राबविला जात आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळेत वाचनाची सवय लावण्याची सूचना करून ‘रिड महाराष्ट्र’ अंतर्गत वाचनालयांची संख्या वाढविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध योजनांचा आढावा घेताना प्रत्येक शाळेत आजी-आजोबा दिवस साजरा करावा, शेती या विषयाचा लवकरच अभ्यासक्रमात समावेश करण्यात येत असल्याने शाळेत किचन/ टेरेस गार्डन तयार करून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह अनुभव देण्यात यावा, तसेच पर्यावरण रक्षण, स्वच्छता आदी बाबतीतही विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे श्री.केसरकर यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!