छत्रपती संभाजीनगर
Trending

वीजचोरीची 4085 प्रकरणे उघडकीस 175 जणांवर गुन्हे दाखल ! मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई !!

छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात गेल्या वर्षभरात वीजचोरीची 4085 प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात ग्राहकांनी 6 कोटी 84 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 175 प्रकरणांत वीजचोरी करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महावितरणतर्फे छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात सातत्याने वीजचोरीविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. यात आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांसह मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात एप्रिल -2022 ते मार्च-2023 या आर्थिक वर्षात मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली.

यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात 1417, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात 1868 तर जालना मंडलात वीजचोरीची 800 प्रकरणे उघडकीस आली. एकूण 4085 प्रकरणांत ग्राहकांना 6 कोटी 84 लाख रुपयांच्या वीजचोरीची बिले देण्यात आली. यातील 595 ग्राहकांकडून वीजचोरीच्या बिलांची 1 कोटी 22 लाख रुपयांची रक्कम महावितरणने वसूल केली आहे.

ज्या ग्राहकांनी वीजचोरीची बिले भरलेली नाहीत, त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया महावितरणतर्फे सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात 3, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात 44 तर जालना मंडलात 128 प्रकरणांत वीजचोरांवर पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

वीजचोरीविरोधातील धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी अधिकृत जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!