महाराष्ट्र
Trending

प्रेमसंबधातून पत्नीनेच “पतीपरमेश्वराचा” झोपेत काढला काटा ! पतीपरमेश्वराचे अनैतिक संबंध असल्याचे भासवून दिली खोटी फिर्याद, जालन्यातील खळबळजनक खूनाचे गूढ उकलले !!

परमेश्वर ऊर्फ प्रमोद झिनेचे मारेकरी ताब्यात, फिर्यादी पत्नीच निघाली आरोपी, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – पती परमेश्वर दारू पिवून मारहाण करायचा. त्यातच दीड वर्षापूर्वी एकासोबत सूत जमले. मग काय तर पत्नीच्या सुपीक डोक्यात भयानक कट शिजला. अंगणात झोपलेल्या पतीपरमेश्वराचा खून केला व त्यानंतर पतीपरमेश्वराचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे भासवून त्या महिलेनेच पतीपरमेश्वराचा खून केल्याचा बनाव केला. एवढेच नव्हे तर त्या महिलेविरोधात पोलिस स्टेशनमध्ये रितसर खोटी तक्रारही दिली. मात्र, जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या जाबाज पोलिसांनी या खूनाचा उलगडा केला. फिर्यादी पत्नीनेच पतीचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. पत्नी व तिचा साथीदार या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

परमेश्वर ऊर्फ प्रमोद झिने (रा. सिरसवाडी रोड टि.व्ही सेंटर जालना) असे मृताचे नाव आहे. तर मृताची पत्नी आशा परमेश्वर ऊर्फ प्रमोद झिने (वय 37 वर्षे रा. सिरसवाडी रोड टि.व्ही सेंटर जालना) व तिचा साथीदार रुपेश योहानराव शिंदे (रा. रेवगाव ता. जि. जालना) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिनांक 07/05/2023 रोजी पोलीस ठाणे तालुका जालना येथे फिर्यादी आशा परमेश्वर ऊर्फ प्रमोद झिने (वय 37 वर्षे रा. सिरसवाडी रोड टि.व्ही सेंटर जालना) हिने फिर्याद दिली होती की, दिनांक 07/05/2023 रोजी सकाळी 06.00 वाजेच्या सुमारास उठून अंगनामध्ये झोपलेले पती परमेश्वर झिने यांना झोपेतून उठविण्यासाठी त्यांच्या जवळ गेले असता त्या ठिकाणी रक्त पडलेले होते. मी आरडाओरड करून आजुबाजुचे शेजारे व नातेवाईक यांना बोलावून घेतले. पती झोपलेल्या ठिकाणी पाहणी केले असता पतीच्या डाव्या कानावर जबड्यावर डोक्यावर धारदार हत्याराने मोठी दुखापत होवून पती मरण पावले होते.

परमेश्वर झिने यांचे व एका महिलेचे दीड ते दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे आम्हा दोघा पती पत्नीमध्ये अधून मधून किरकोळ भांडण होत होते. तेंव्हा पती परमेश्वर यांनी फोनवरून त्या महिलेसोबत सोबत माझे बोलणे करून दिले होते. तसेच ती महिला व पती यांचे ब-याच वेळा प्रेम संबंधात अधून मधून वाद होत होते. ती महिला ही माझे पतीस फोन वरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत होती.

तिनेच पती परमेश्वर झिने यांस दिनांक 06/05/2023 रोजीचे रात्री दहा ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घरासमोर अंगनात पलंगावर झोपलेले असतांना त्या महिलेने व तिच्या इतर साथीदारांनी धारदार हत्यारांनी पतीचे डोक्यावर, जबडयावर जबर वार करून त्यांना जिवे ठार मारले आहे. तरी त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही व्हावी वगैरे मजकुराचे फिर्यादवरुन पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना सूचना व मार्गदर्शन केले होते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना हे त्यांचे अंमलदार यांचेसह गोपनिय बातमीदारांकडून गुन्हयाची बारकाईने माहीती घेत असतांना गोपनिय बातमीदार तसेच तांत्रीक विश्लेषनावरुन गुन्हयातील फिर्यादी हिच आरोपी असल्याची माहीती मिळाल्याने फिर्यादी हिस ताब्यात घेतले.

तिला विश्वासात घेवून सखोल बारकाईने विचारपूस केली असता तिने सविस्तर माहीती दिली की, मृत तिचे पती परमेश्वर ऊर्फ प्रमोद झिने यांना दारूचे व्यसन होते दारु पिवून ते नेहमी तिला मारहाण करत होते. मागील दीड वर्षापूर्वी तिचे व तिचा आरोपी साथीदार रुपेश योहानराव शिंदे (रा. रेवगाव ता. जि. जालना) यांच्यात प्रेमसंबंध होते. तिचे प्रेमसंबंधा बाबत पतीस माहीती झाल्याने तिस पती नेहमी मारहाण करत असल्यामुळे मागील एक महिन्यापासून पतीस जिवे ठार मारण्याचे तिने ठरवले होते.

दिनांक 06/05/2023 रोजी रात्री दोघां पती पत्नी मध्ये भांडण झाले होते. रात्री बारा-साडे बारा वाजेच्या दरम्यान तिने घराबाहेर येवून पती झोपल्याची खात्री करून जवळ ठेवलेल्या कु-हाडीने पतीच्या डोक्यात सपासप वार करून जागीच ठार केले व घडलेली घटना तात्काळ तिच्या प्रियकरास सांगितली दोघांनीही आपसात भेटून विचार विनिमय करून पतीचे प्रेमसंबंध असलेल्या महिलेच्या नावाने तक्रार देण्याचे ठरवून तिच्या नावाने तक्रार देण्याचे ठरविले.

ठरल्याप्रमाणे सकाळी सहा वाजेच्या दरम्यान झोपेतून ऊठून आरडा-ओरड करून आजु-बाजुचे शेजारी व नातेवाईक जमा करून पतीस त्यांच्या प्रेयसिनेच मारल्याचे पोलिसांना व नातेवाईकांना सांगितले व पोलिसांत तशी तक्रार देखील केली. आरोपी महिला हिने गुन्हयाची सविस्तर माहिती देवून तिने तिच्या प्रियकराचे मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. तिस व तिचा प्रियकर या दोघांनाही ताब्यात घेवून पोलीस ठाणे तालुका जालना यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, अंमलदार सॅम्युअल कांबळे, संजय मगरे, संभाजी तनपुरे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, फुलचंदाने भाऊराव गायके, गोपाल गौशिक, सुधीर वाघमारे, योगेश सहाने, कैलास चेके, भागवत खरात, सागर बावीस्कर, महिला अंमलदार चंद्रकला शडमल्लु, रेणुका बांडे चालक रमेश पैठणे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!