महाराष्ट्रराजकारण
Trending

२६५१ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला; राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक घोडदौड: जयंत पाटील

नागपूर दि. २० डिसेंबर –  महाराष्ट्रात अधिकृत घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुक निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १३०० ग्रामपंचायतीवर आणि महाविकास आघाडीचे इतर दोन घटक पक्ष लक्षात घेता २६५१ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.

शिवसेना आणि भाजप यांच्या मिळून साधारणपणे २२०० ग्रामपंचायतीवर झेंडा फडकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ग्रामीण भागातील जनतेने फार मोठ्याप्रमाणावर साथ दिली आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे त्यामुळे आपल्या लक्षात येईल की दलबदलूचे राजकारण महाराष्ट्र मान्य करत नाही. साम-दाम-दंड-भेद वापरून, सत्ता वापरून, सत्तेचा दुरुपयोग करून देखील महाविकास आघाडीचा पराभव भाजप व शिंदे गट करु शकत नाही हे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात सिध्द झाले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

अजून काही १४०० ग्रामपंचायतीचे निकाल यायचे आहेत. त्यामुळे भाजप – शिंदे गटातील अंतर वाढेल. महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या पक्षांना पुन्हा एकदा प्राधान्य दिले आहे अशी खात्री व्यक्त करतानाच जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेचे जाहीर आभार मानले आहेत.

साम-दाम-दंड-भेद वापरूनदेखील महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिंदे गटाचा पराभव केला आहे. हे या आकडयावरुन सिध्द होत आहे. भाजप त्यांच्याबाजुने निकाल लागले आहेत असे बोलत असले तरी चार – साडेचार वाजता निकाल जाहीर व्हायच्या आधीच एकमेकांना लाडू भरवत होते.आम्ही सर्व निकाल लागण्याची वाट बघणार आहोत. पूर्ण निकाल लागल्यावर अधिकृत आकडेवारी देण्याचे काम करेन असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्यावतीने जनतेने दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल जयंत पाटील यांनी आभार मानले. उद्या सात हजार सातशे ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होतील त्यावेळी खरी आकडेवारी आपल्यासमोर मांडण्यात येईल असे स्पष्ट करतानाच महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी गड, ग्रामपंचायत राखल्याबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Back to top button
error: Content is protected !!