महाराष्ट्र
Trending

औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेच्या संदर्भात लवकरच धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 : औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेच्या (ॲश) संदर्भात लवकरच धोरण तयार करण्यात येत आहे. तसेच वाहनातून होणाऱ्या कोळसा चोरीला आळा बसवण्यासाठी कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही आणि ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य उमा खापरे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, औष्णिक विद्युत प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या राखेच्या अनुषंगाने आपण धोरण तयार करीत आहोत. तसेच या राख वाहतूकीच्या अनुषंगाने निविदा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधित वाहनांवर सीसीटीव्ही, व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम असणे आवश्यक असणार आहे. तसेच ही राख स्थानिकांना व्यवसायासाठी सवलतीच्या दराने उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिथे जिथे ॲशबंड्स तयार झाले आहेत, त्याठिकाणी निश्चित कालावधीत ऑडीट करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

यावेळी सदस्य एकनाथ खडसे, अभिजीत वंजारी यांनी उपप्रश्न विचारले. त्यालाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले.

Back to top button
error: Content is protected !!