हडको सिडकोत एका महाभागाने चक्क सरकारी रस्ताच दिला भाड्याने, रसवंती थाटून एक लाख डिपॉझिट आणि दिवसाला हजार रुपयांचे मीटर ! महानगरपालिकेच्या पथकाने २० अतिक्रमण केले भूईसपाट !!
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची स्वामी विवेकानंद नगर येथे पुन्हा कारवाई
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आज सिडको आणि हडको भागात एकूण २० अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. एका महाभागाने तर सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करून चक्क रसवंती थाटली. त्यासाठी १ लाख डिपॉझिट आणि दिवसाला हजार रुपयांचे मीटर सुरु होते. ही माहिती मिळताच मनपाच्या पथकाने सदर अतिक्रमित रसवंतीवर कारवाई करण्यात आली.
सिडको एन ०५ येथील एका नागरिकांने सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी रसवंती भाड्याने दिली. या भागातील नागरिकांच्या माहितीनुसार आणि केलेल्या चौकशी नुसार सदर जागेचे प्रत्येक दिवस हजार रुपये भाडे आणि एक लाख रुपये डिपॉझिट अशा प्रकारचा लेखी करारनामा करण्यात आला होता. सचिन नागुल यांचा प्लॉट क्रमांक 87 सिडकोचा असून त्यांनी त्यांच्या घराच्या बाजूला सिडको आणि महानगरपालिकेची सरकारी जागा असून त्या खालून पाईपलाईन जात आहे. त्यांनी अंदाजे 12 बाय 30 या आकाराच्या जागेवर सदर रसवंती भाड्याने दिली होती. त्या रस्त्यासाठी वेगळा कमर्शियल मीटर घेतले होते. सदर अतिक्रमण महापालिकेच्या वतीने आज निष्कासित करण्यात आले.
त्याच्या बाजूला पुजारी यांनी त्यांच्या सामासिक अंतर व पार्किंगच्या जागेत अशाच प्रकारे रसवंती भाड्याने दिली होती. एक लोखंडी टपरी टाकली होती व डॉक्टर पुजारी नावाची अनधिकृत रित्या पाटी रोडवर लावली होती यांचे अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले. या रस्त्यावर चितशिया पोलीस चौकीपर्यंत सामासिक अंतरासमोर काही नागरिकांनी पाणीपुरी भेळपुरी व इतर अतिक्रमण केले आणि यामुळे पार्किंगच्या प्रश्न निर्माण होऊन संध्याकाळी मोठी गर्दी होते व तणाव होऊन आपसात भांडण होतात. याच रस्त्यावर दोन दहा बाय बारा व दहा बाय दहा पत्र्याचे शेड निष्काशीत करण्यात आले.
तसेच आज पुन्हा एन १२ परिसरातील स्वामी विवेकानंद नगर भागात कारवाई करून एका ब्युटी पार्लर चालक महिलेने ऑड शेपच्या जागेवर कंपाउंड वाल बांधून बंद केलेला रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला व कंपाउंड वॉल निष्काशीत करण्यात आले. याच भागातील दोन रसवंतीचे शेड आणि एक लोखंडी टपरी जप्त करण्यात आली.
सायंकाळी साडेसहाच्या नंतर सिडको कॅनॉट परिसरात पथकाने कारवाई करून रस्त्यावर अतिक्रमण करणारे आणि वाहतूक अडथळा कर करणाऱ्या चार चाकी हातगाड्या व इतर अतिक्रमणधारका विरुद्ध कारवाई करण्यात आली.
ही कारवाई प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त -२ तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, अतिक्रमण बांधकाम निरीक्षक सय्यद जमशेद, पंडित गवळी, रामेश्वर सुरासे, सिडकोचे मिलन खिल्लारे,नगररचना विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी कारवाई सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe