राजकारण
Trending

राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण होणार? समितीची आज तातडीची बैठक, या नावांची होऊ शकते घोषणा !

नवी दिल्ली, – राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या समितीची आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते. शरद पवार यांनी 2 मे रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार हे अजून गुलदस्त्यात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडेच राष्ट्रवादीचे अध्यक्षपद कायम ठेवावे, अशी मागणी वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेऊ, असे पवार यांनी गुरुवारी सांगितले होते. शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे किंवा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे पुढील अध्यक्ष होऊ शकतात, असा राजकीय गोटात तर्क लावला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावावर विचार करण्यासाठी आज, शुक्रवारी वरिष्ठ नेत्यांच्या समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. अध्यक्ष निवडीसाठी शरद पवार यांनी 18 सदस्यांची समिती यापूर्वीच गठित करण्यात आली होती. ही समिती शरद पवार यांना राजीनाम्यावर पुनर्विचार करण्याचा ठराव मांडू शकते. किंवा नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणाही होऊ शकते. पवार यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव हा पर्यायही समोर येऊ लागला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाच्या भवितव्यासाठी आणि नवे नेतृत्व उभे करण्यासाठी आपण पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी त्यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात जाहीरपणे घेतला होता. या निर्णयाचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला निर्णय परत घ्यावा, यासाठी कार्यकर्त्यांनी केंद्राबाहेरच आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यांच्यावर आग्रह टाकण्यात आला. दरम्यान, वायबी चव्हाण केंद्राबाहेर पवार म्हणाले की, येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेऊ आणि कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.

त्यांना पक्षप्रमुखपदी कायम ठेवण्याची मागणी करत पवारांचे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. जयंत पाटलांसह अनेकांना अश्रु अनावर झाले होते. दरम्यान, या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण शुक्रवारी महाराष्ट्राबाहेरील पक्षाच्या काही सहकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. एक-दोन दिवसांत मी अंतिम निर्णय घेईन, असेही ते म्हणाले होते.

आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्याने पवारांनी किमान २०२४ पर्यंत पक्षाचे नेतृत्व करावे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. शरद पवार यांनी २ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची जाहीर घोषणा केली होती.

पवार म्हणाले होते, ‘माझा राज्यसभा सदस्य म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. यादरम्यान मी पक्षात कोणतेही पद न घेता महाराष्ट्र आणि देशाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. 1 मे 1960 पासून खूप काळ लोटला आहे आणि मला एक पाऊल मागे घेणे आवश्यक आहे. मी तुमच्यासोबत असेन, पण पक्षप्रमुख म्हणून राहणार नाही.

पवारांच्या या अनपेक्षित घोषणेमुळे राजकीय गोटात भूकंप झाला. खासकरून महाविकास आघाडीबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली. पवारांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाला दूर ठेवण्यासाठी भिन्न विचारांच्या पक्षांनी म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करून देशाच्या राजकारणात इतिहास नोंदवला. सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले. मात्र, शिवसेनेतील बंडाने महाविकास आघाडीची सत्ता गेल्याने मोठा धक्का बसला. आणि आता पवारांनीच राष्ट्रीय अध्यक्षाचा राजीनामा दिल्याने हा दुसरा धक्का महाविकास आघाडीला बसल्याचे बोलले जात आहे.

Back to top button
error: Content is protected !!