छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

अ‍ॅकडमिक ऑडिटमध्ये ८३ महाविद्यालये नापास, बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ३३ महाविद्यालये ! प्रवेश क्षमता स्थगित तसेच कमी करण्याचा निर्णय !!

केवळ १९ महाविद्यालयांनाच मिळाला ग्रेड

संभाजीनगर लाईव्ह, दि.३० -: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ८३ महाविद्यालये ’अ‍ॅकडमिक ऑडिट’ अर्थात शैक्षणिक अंकेक्षणात ’नो ग्रेड’ अर्थात नापास ठरली आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांची मनुष्यबळ व पायाभूत सुविधा तपासूनच प्रवेश क्षमता स्थगित तसेच कमी करण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून पहिल्यांदाच संलग्नित महाविद्यालयांचे अ‍ॅकडमिक ऑडीट सुरु करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २७१ महाविद्यालयांचे अकॅडमिक ऑडिट करण्यात आले. दुस-या टप्प्यात १०२ महाविद्यालयांचे ऑडीट करण्यात आले. या संदर्भात शैक्षणिक विभागाच्यावतीने सोमवारी रात्री ’ऑडीट’ संदर्भातील ’ग्रेड’सह यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीत १०२ महाविद्यालयांचा समावेश असून १९ महाविद्यालयांना ए,बी,सी,डी यापैकी एक श्रेणी प्राप्त झाली आहे.

जिल्हयानिहाय ग्रेड प्राप्त महाविद्यालये पुढीलप्रमाणे : –
छत्रपती संभाजीनगर जिल्हा : (नऊ)
१. विनायकराव पाटील महा.वैजापूर (ए ग्रेड), २.एमपी लॉ कॉलेज (बा), ३.शासकीय ज्ञान विज्ञान महा. (बी), ४. देवगिरी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (सी), ५.जे.के.जाधव महा.वैजापूर (सी), ६.चिश्तिीया महाविद्यालय, खुलताबाद (डी), ७. राजीव गांधी संगणकशास्त्र महा. (डी), ८.शासकीय औषधनिर्माणशास्त्र महा. (डी), ९.शासकीय कला व डिझाईन महा. (डी)

बीड जिल्हा – (चार)
१०. वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर (सी), ११. गुरुकुल बी.एड.महा (डी), १२. वैद्यानाथ महाविद्यालय परळी (डी), १३. शासकीय अध्यापक महा.अंबाजोगाई (डी).

जालना जिल्हा (चार)
१४. शिवराज महा. पिंपळगांव (सी), १५. रमेशभादऊ शेंडगे महा.इंदेवारी (डी), १६.सी.पी.अध्यापक महा.जालना (डी), १७ ज्ञानसागर महा.जाफराबाद

धाराशिव जिल्हा (दोन)
१८. के.टी.पाटील व्यवस्थापन शास्त्र महा. (सी), १९ डॉ.बापुजी सांळुके विधि महा. (डी) यापैकी केवळ वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयास ’अ’ दर्जा मिळालेला आहे. तर उर्वरित १८ महाविद्यालयांना बी, सी व डी श्रेणी प्राप्त झाली आहे.

बीड जिल्हयातील सर्वांधिक महाविद्यालये ’नोग्रेड’ :
अ‍ॅकडमिक ऑडिट झालेली जिल्हानिहाय महाविद्यालये पुढील प्रमाणे – बीड एकूण ३७ – ग्रेड -४, नोग्रेड -३३, छत्रपती संभाजीनगर – एकूण २८ ग्रेड -४, नोग्रेड -१९, जालना एकूण ११ ग्रेड -२, नोग्रेड -९, धाराशिव एकूण २६ ग्रेड -४, नोग्रेड -२२ चार जिल्हयातून १९ महाविद्यालयांना ए, बी, सी, डी याप्रमाणे श्रेणी प्राप्त झाली. तर ८२ महाविद्यालये ’नोग्रेड’ श्रेणीत आली आहेत. या महाविद्यालयांची पायाभूत सुविधा व मनुष्यबळ तपासून प्रथम वर्षांची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी संख्याही घटविण्यात येणार आहे.

आपेक्ष नोंदविण्यासाठी मूदत -: या संदर्भात प्रकाशित पत्रकात म्हटले आहे, की कुलगुरु महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्राअतंर्गत येणा-या सर्व संलग्नित महाविद्यालयांना कळविण्यात येते की, या कार्यालयाचे पत्र दि. २५ -०१-२०२३ अन्वये प्राप्त ऑनलाईन व ऑफलाईन शैक्षणिक व प्रशासकिय अंकेक्षणाचे प्राप्त प्रस्ताव अनुषंगाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ११७ (०१) व (०२) अन्वये करण्यात आलेल्या अंकेक्षणाची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. प्राप्त प्रस्तावांपैकी उर्वरित ३४ महाविद्यालयांच्या अंकेक्षणाची यादी लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे. ज्या महाविद्यालयांना प्राप्त श्रेणीबाबत काही आक्षेप असल्यास तसे प्रस्ताव आवश्यक त्या दस्तऐवजासोबत ०७ दिवसांत सादर करावेत, असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ.संजय कवडे यांनी सांगितले.

शैक्षणिक अंकेक्षण, दर्जा विद्यापीठाचे उत्तरदायित्व : कुलगुरु
नवीन महाविद्यालयांना मान्यता राज्य शासनाकडून तसेच व्यावसायिक महाविद्यालयांना स्वायत्ता परिषदांकडून मान्यता मिळते. तथापि शैक्षणिक दर्जा, अंकेक्षण व गुणवत्ता तपासणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे. विद्यापीठ प्रशासन म्हणून आम्ही आमचे उत्तरदायित्व पार पाडतोय, अशी प्रतिक्रिया मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली. २०२३-२४ या वर्षांसाठी संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त अभ्यासक्रम व प्रवेश क्षमता या संदर्भातील अंतिम यादी बुधवारी दि.३१ सायंकाळी प्रसिध्द होणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!