’पॉल हबर्टे सेंटर’ मध्ये ४० लाख रुपये खर्चातून अत्याधुनिक सुपर कॉम्प्यूटर बसवणार ! विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासोबत दोन नवीन इमारतींचेही उद्घाटन !!
कुलपतींच्या हस्ते ’महासंगणका’चे ही लोकार्पण, सुमारे साठ हजार स्नातकांना पदवींचे वितरण
संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षांत समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. याच दिवशी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दोन इमारतींचे उद्घाटन तसेच ’सूपर कॉम्प्युटर’चे लोर्कापणही करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत सोहळा राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस, ’एआययु’च्या महासचिव डॉ.पंकज मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ जून रोजी होत आहे. या संदर्भात विद्यापीठाच्यावतीने मंगळवारी दि.२० व्यवस्थापन परिषद कक्षात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, परीक्षा मंडळ संचालक डॉ.भारती गवळी, प्रसिध्दी समितीचे डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ.गणेश मंझा, संजय शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षाचा हा दीक्षांत सोहळा असणार आहे. यामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ व मार्च-एप्रिल २०२२ या परीक्षेतील पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येईल. यामध्ये जवळपास ६० हजार पदवी व पदव्यूत्तर पदवीधारकांच्या पदव्यांना या सोहळयास मान्यता प्रदान करण्यात येणार आहे. तसेच १९ नोव्हेंबर २०२२ ते आजपर्यंत पीएच.डी प्राप्त करणा-या २९१ संशोधकांना दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात येईल.
कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या सोहळयास ’असोशिएशन ऑफ इंडियन युनिर्व्हसिटीज’च्या महासचिव प्रख्यात शिक्षणतत्ज्ञ डॉ.पंकज मित्तल या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. २७ जून रोजी सकाळी १० वाजता नाटयगृहात हा सोहळा होईल. यावेळी सवैधनिक अधिकारी यांच्यासह सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता यांच्यासह सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत. या सोहळयाच्या तयारीसाठी २५ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
दोन इमारतीचे उद्घाटन
कुलपती तथा राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते ’पॉल हर्बट सेंटर फॉर डी.एन.बारकोडींग अॅण्ड बायोडायव्हिसिटी’ व ’व्होकेशनल स्टडीज’ या दोन इमारतीचे उद्घाटन दीक्षांत सोहळानंतर करण्यात येईल. केंद्र शासनाच्या विविध संस्थाच्या माध्यमातून ६ कोटी ६१ लाखांचा निधी यासाठी खर्च झाला आहे. बायोडॉयर्व्हसिटी जिनोनिन्स या विषयातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करणारी ही संस्था असून डॉ.गुलाब खेडकर हे संचालक आहेत. तर दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या व्होकेशनल स्टडीज केंद्राच्या संचालक डॉ.भारती गवही या आहेत.
’महासंगणकाचे’चे लोकार्पण
’पॉल हबर्टे सेंटर’ मध्ये ४० लाख रुपये खर्चातून अत्याधुनिक सुपर कॉम्प्यूटर बसविण्यात येणार आहे. पुणे येथील पद्मश्री डॉ.विजय भटकर संचलित ’सीडॅक’ या संस्थेने ’सूपर कॉम्प्यूटर सिस्टीम’ अंतर्गत या महासंगणकाची निर्मिती केली आहे. कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते लोकार्पण करुन हा प्रकल्प पूर्वत्वास येईल, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe