महाराष्ट्रराजकारण
Trending

अजित पवारांसह शपथ घेणारे समर्थक आमदार अपात्र ठरणार, नऊ आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली ! विशिष्ट कालावधीनंतर त्यांच्यावर कारवाई: जयंत पाटील

मुंबई दि. ३ जुलै – अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पवारसाहेबांना आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

येत्या ५ जुलै रोजी पवारसाहेबांनी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल अशी खात्री व्यक्त करतानाच पवारसाहेबांसोबत असणारा, पवारसाहेबांना पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी असेल असे स्पष्ट केले.

आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. ९ आमदार सोडले तर सर्व आमदार अद्याप आमच्यासोबत आहेत. विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

ज्याक्षणी ९ आमदारांनी शपथ घेतली त्याचक्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्यांचीशी बोलणेही झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!