छत्रपती संभाजीनगर
Trending

धावत्या ट्रकला थांबवून दरोडा टाकणारी टोळी झाल्टा फाटा ते देवळाई रोडवर पकडली ! धूळे सोलापूर रोडवर सुरु होती दादागिरी, चिकलठाणा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दरोड्याचा प्रयत्न फसला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ११- धूळे सोलापूर महामार्गावर धावत्या ट्रकला थांबवून ट्रक चालकांना लुबाडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला चिकलठाणा पोलिसांनी पाठलाग करून पकडले. एका ट्रक चालकाने डायल 112 वर ही माहिती दिल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांना पाहून ही टोळी तेथून झायलो गाडीत धूम ठोकली. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग सुरु केला. मध्यरात्री हा पाठशिवणीचा खेळ सुरु होता. पोलिसांनी हार न मानता झाल्टा फाट्यापासून सुरु केलेला पाठलाग देवळाईच्या जवळ अखेर संपला. पोलिसांनी झडप घालून या संशयितांना पकडले. तीन जण पोलिसांच्या हाती लागले अन्य दोन जण अंधाराचा फायदा उचलून पोलिसांशी झटापट करून पळून गेले. एका सजग ट्रक चालकाने पोलिसांना तातडीने माहिती दिल्याने आरोपीतांचा दरोड्याचा प्रयत्न फसला.

दिनांक 11/8/2023 रोजी मध्यरात्री नंतर 2:30 वाजेच्या सुमारास पोलीस नियंत्रणकक्ष ग्रामीण यांच्या डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर एका ट्रक ड्रायव्हरने माहिती दिली की, पोलिस ठाणे चिकलठाणा हद्यीतील धुळे सोलापुर महामार्गावर झाल्टा फाट्या जवळ काही संशयित व्यक्ती हे दादागिरी करून ट्रक थांबवत आहेत. ट्रक ड्रायव्हर यांना धमकी देवून मारहाण करून बळजबरीने पैसे उकळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षाचे डायल 112 क्रमांकावर कॉल प्राप्त होताच त्यांनी संकट कॉलला तातडीने प्रतिसाद देत क्षणांचा विलंब न करता मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार तात्काळ माहिती ही चिकलठाणा पोलिसांच्या रात्र गस्तीवरील पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांना दिली. घटनेचे गांर्भीय लक्षात घेता पो.नि. खांडेकर यांनी तात्काळ आपल्या गस्तीचे वाहन झाल्टा फाट्याच्या दिशेने वळवले यादरम्यान त्यांनी सदर ट्रक ड्रायव्हरला संपर्क साधला असता त्यांने सांगितले की, त्याला अर्जंट पुढे जाणे असल्याने त्याने  घाबरून तिथे न थांबता खुप पुढे निघून गेला आहे, परंतु ते लोक इतर ड्रायव्हरला सुध्दा दादागिरी करून थांबवतील म्हणून 112 क्रमांकावर माहिती दिली आहे.

यादरम्यान चिकलठाणा पोलिसांचे पेट्रालिंग वाहन हे झाल्टा फाट्याच्या दिशने येताना संशयितांना दिसताच त्यांनी त्यांच्या काळ्या रंगाचे झायलो गाडीने देवळाईच्या दिशेने सुसाट धुम ठोकली. पोलिसांनीही त्यांचा देवळाईच्या दिशेन पाठलाग सुरू केला. पोलिस पाठलाग करत असल्याचे पाहून त्यांनी त्यांच्या गाडीचा वेग वाढवला तरीही पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवत पोलिस आणि संशयित यांचा पाठशिवणीचा हा खेळ रात्री 3:45 पर्यंत सुरू होता. यादरम्यान देवळाईच्या अलिकडे हॉटेल सोनियाच्या पुढे पोलिसांच्या गाडीने त्यांच्या गाडीला हुलकावनी देवून रोडच्या खाली उतरवण्यास भाग पाडले.

यानंतर पोलिसांनी संशयितांच्या दिशेन झेप घेवून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असताना यातील दोन जण पोलिसांशी झटापट करत अंधाराचा फायदा घेत पसार झाले तर तिघांना कसोशिने व शिताफिने पकडण्यात चिकलठाणा पोलिसांना यश आले. पकडलेल्या संशयिताना विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे नावे 1) अजय नितीन कटकटे (वय 24 वर्षे रा. खोकडपुरा), 2) सागर मधुकर आढाव (वय 23 वर्षे रा.खंडोबा मंदिराजवळ), 3) मनोहर लक्ष्मण ससे (वय 20 वर्षे रा.राजनगर, मुकूंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले.

झायलो वाहन क्रमांक एम.एच.06 ए.झेड. 1677 त्यामध्ये एक लोखंडी पहार, मिरचीपुड, नॉयलॉन दोरी, काळ्या रंगाचा चाकू, स्क्रु ड्रायव्हर, असे दरोड्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. त्यांच्या ताब्यातील झायलो वाहन हे सुध्दा चोरी केलेले असण्याची शक्यता आहे. त्यांच्या ताब्यातून हे सर्व साहित्य सह झायलो गाडी अंदाजे कि.अं. 3,00,000/- (तीन लक्ष रूपये) जप्त करण्यात आली आहे. आरोपीतांविरूध्द पोलीस ठाणे चिकलठाणा येथे भादंवी कलम 399 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे, पुढील तपास चिकलठाणा पोलीस करित आहेत.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकार यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र खांडेकर, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सुरेश अपसनवाद, दिपक देशमुख, विशाल लोंढे, अशोक मुळे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!