महाराष्ट्र
Trending

विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून जखमींची विचारपूस ! नागरिकांनी शांतता राखण्याचे प्रशासनाचे आवाहन !!

जालना, दि. 2 – मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर कुठल्याही अफवेला बळी न पडता नागरिकांनी शांतता राखवी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनात जखमी झालेल्या नागरिकांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात यावेत, जर आवश्यकता भासल्यास खाजगी रुग्णालयात जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

आज पालकमंत्री अतुल सावे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी अंतरवली सराटी येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सरकार अतिशय संवेदनशीलपणाने आंदोलनाच्या विषयाकडे पाहत आहे आणि आरक्षणासाठी सकारात्मकरित्या कार्यरत आहे, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट करत नागरिकांना संयम बाळगून शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमी नागरिकांची भेट घेऊन त्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी केली.

विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून जखमी आंदोलकांची विचारपूस – दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या जखमीं नागरिकांची भेट घेऊन सहानुभूतीपूर्वक चौकशी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचाराबाबत योग्य त्या सूचना केल्या. दरम्यान, जिल्हयात आज काही ठिकाणी अनुचित प्रकार वगळता शांतता होती.

Back to top button
error: Content is protected !!