महाराष्ट्र
Trending

विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण पोषक आहार देणार, आठवड्यातून एकदा अंड्यासह पोषक तत्व आणि आवड लक्षात घेऊन आहार तयार करण्याचे निर्देश !

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण पोषक आहार देणार- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Story Highlights
  • दाळ-भात आणि खिचडी बरोबरच हिरवा वाटाणा, व्हेज पुलाव, सोया चंक्स, मसाले भात, वांगी भात, नाचणी सत्व, भगर, शेवगा आदींचा समावेश
  • जे विद्यार्थी अंडे खातात त्यांना आठवड्यातून एकदा अंडे देणार
  • तसेच अन्य विद्यार्थ्यांना केळीचा पर्याय ठेवावा
  • आहारात या पदार्थांबरोबर एका गोड पदार्थाचा देखील समावेश करावा
  • भाज्या आणि सलादचा देखील आहारात समावेश करावा

मुंबई, दि. 12 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषक आहार दिला जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. आठवड्यातून एकदा अंड्यासह पोषक तत्व आणि विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन हा आहार तयार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत (पूर्वीचे नाव शालेय पोषण आहार योजना) सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. बुधवारी (दि.11) सायंकाळी या समितीची बैठक मंत्री श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य तथा प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी, व्यापारी महासंघ सिंधुदुर्गचे कार्यवाह नितीन वाळके, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना गडचिरोलीचे अधीक्षक वैभव बारेकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे, तर योजनेचे राज्य समन्वय अधिकारी देवीदास कुलाळ, सहसचिव इम्तियाज काझी, अवर सचिव प्रमोद पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना आहारातून पोषक तत्वे मिळावीत. त्याचबरोबर त्यांनी ते पदार्थ आवडीने खावीत हा विचार करून पाककृती निश्चित कराव्यात. यासाठी दररोज वैविध्यपूर्ण आहार निश्चित करून त्यात दाळ-भात आणि खिचडी बरोबरच हिरवा वाटाणा, व्हेज पुलाव, सोया चंक्स, मसाले भात, वांगी भात, नाचणी सत्व, भगर, शेवगा आदींचा समावेश करावा. जे विद्यार्थी अंडे खातात त्यांना आठवड्यातून एकदा अंडे द्यावे. तसेच अन्य विद्यार्थ्यांना केळीचा पर्याय ठेवावा. आहारात या पदार्थांबरोबर एका गोड पदार्थाचा देखील समावेश करावा. शाळांमध्ये परसबाग आवश्यक करण्यात आली आहे. यातील भाज्या आणि सलादचा देखील आहारात समावेश करावा, असे निर्देश मंत्री केसरकर यांनी दिले. यापूर्वीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेफ विष्णू मनोहर यांनी काही पाककृती तयार केल्या आहेत. त्यापैकी केंद्र शासनाच्या निकषात बसणाऱ्या पदार्थांचा देखील आहारात समावेश करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

सध्या जेथे केंद्रीय स्वयंपाकगृह आणि बचत गटांमार्फत आहाराचा पुरवठा करण्यात येतो त्यातील पोषण तत्व आणि दर्जाची तपासणी करण्यासाठी समिती सदस्यांना प्राधिकृत करण्याचे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर सदस्यांनी आहार तयार करणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षण द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांची पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविणे, गळती थांबविणे, पोषणयुक्त आहार पुरविणे, आरोग्याच्या चांगल्या सवयी लावणे आणि सामाजिक समानता विकसित करण्यासाठी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळा, वस्ती शाळा, अनुदानित अपंग शाळा, महात्मा फुले शिक्षण हमी योजनेअंतर्गत शैक्षणिक केंद्र या ठिकाणी पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत. राज्यातील 85,648 शाळांमधील एक लाख 65 हजार 103 विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत या योजनेचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती अवर सचिव श्री. पाटील यांनी यावेळी दिली.

Back to top button
error: Content is protected !!