बंगला जाळल्याची आमदार प्रकाश सोळंकेंनी सांगितली आपबीती: तुफान दगडफेक, पेट्रोल बॉम्बने जाळपोळ, आतापर्यंत २१ जणांना अटक ! इतर समाजातील लोकांचाही समावेश, जमावात काही शिक्षकही होते !!
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी माझाही प्रयत्न मात्र घरावर समाजकंटकांनी केलेला हल्ला पूर्वनियोजित - प्रकाश सोळंके
मुंबई दि. २ नोव्हेंबर – मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. तसा मीसुध्दा या आंदोलनात मागील दोन महिन्यांपासून सहभागी आहे असे सांगतानाच समाजकंटकांनी आपल्या घरावर कशापद्धतीने हल्ला केला याची आपबीती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
दरम्यान या हल्ल्यासाठी आलेल्या जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त इतर जातीचे लोक सहभागी होते. याशिवाय अवैध धंदे करणारे लोकदेखील होते आणि राजकीय विरोधकही होते असा आरोपही आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी केला. या जमावात काही शिक्षकही होते. शिवाय जो ३०० जणांचा जमाव आला होता त्यांच्याकडे शस्त्र होती. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते असेही प्रकाश सोळंके म्हणाले.
गेल्या दोन महिन्यांपासून मराठा आरक्षण विषय सुरू आहे. राज्यभरात आंदोलने सुरु आहेत. देशात आणि राज्यात आंदोलन होत आहेत. बीड जिल्ह्यात वातावरण गंभीर आहे. २०११ पासून मनोज जरांगे पाटील आरक्षण विषयावर काम करत आहेत. संपूर्ण मराठा समाज त्यांच्या नेतृत्वात एकवटला आहे. अतिशय प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण व्यक्ती म्हणून ते पुढे येत आहे असेही प्रकाश सोळंके म्हणाले.
माजलगाव मतदारसंघाचा आमदार होण्यापूर्वी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य देखील होतो. माझे वडील जिल्हा परीषद अध्यक्ष होते. १९६७ ते १९८० ते राज्यमंत्री, मंत्री देखील होते. मी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. १९८७ ते २०२३ असा ३६ वर्षांचा अनुभव प्रकाश सोळंके यांनी सांगितला.
ज्यावेळी ३० ऑक्टोबरला घटना घडली त्यावेळी घरातच होतो. माजलगाव बंद करण्यात आले होते. त्यावेळी ५ हजार तरुण आले होते. साडे दहा वाजता काही तरुण आले आणि त्यांनी मला हा सर्व जमाव माझ्या घरावर येणार आहे अशी माहिती दिली. मी तरीदेखील तिथेच थांबलो. मी त्यांच्याशी चर्चा करावी यासाठी थांबलो होतो मात्र माझ्या घरावर जोरदार दगडफेक करण्यात आली. जो जमाव आला त्यात अवैध धंदे करणारे आणि राजकीय विरोधक लोक जास्त होते असेही प्रकाश सोळंके यांनी सांगितले.
पोलिसांना सीसीटिव्ही फुटेज दिले आहेत. केवळ दोषींवर कारवाई करा. सरसकट कारवाई करु नका अशी मागणी पोलिसांकडे केली असल्याचेही प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली आहे. ही बीड पोलीस प्रशासनाचे अपयश आहे. ज्या घटना घडल्या त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. मला असे वाटतेय की पोलिसांचे मनोधैर्य जालना घटनेनंतर कमी झाले आहे. ते वाढवणे गरजेचे आहे असेही प्रकाश सोळंके म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी कालबध्द कार्यक्रम द्यावा. आरक्षण कसे देणार आहात याबाबत देखील खुलासा करावा अशी विनंती आमदार प्रकाश सोळंके यांनी सरकारला केली आहे. माझ्या घरावर हल्ला करणाऱ्यांमध्ये आतापर्यंत २१ लोकांना अटक झाली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर ही अटक असून त्यामध्ये मराठा समाज वगळता इतर ८ आरोपी आहेत अशी माहितीही प्रकाश सोळंके यांनी दिली. या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, सरचिटणीस लतिफ तांबोळी उपस्थित होते.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe