टॉप न्यूजमहाराष्ट्र
Trending

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, विविध देयकांचा निपटारा तातडीने करणार !

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि.३ : अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध देयके अदा करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या सर्व देयकांचा तातडीने निपटारा केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.

याबाबतची लक्षवेधी सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केली होती त्याला उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते. ते म्हणाले की, संबंधितांची देयके आर्थिक तरतूद नसल्याने प्रलंबित होती. त्यासंदर्भात निधीची तरतूद करण्यात आली असून देयके अदा करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल. या देयकांच्या प्रस्तावात आढळून येणा-या त्रुटींची पूर्तता लवकर होण्याच्या दृष्टीने त्रुटींची एक चेकलिस्ट तयार केली जाईल, जेणेकरुन एकदाच सर्व त्रुटींची माहिती संबंधितांना होईल.

या संदर्भात प्राप्त तक्रारींचे अवलोकन करून आवश्यकता असल्यास उचित कार्यवाही करण्यात येईल. तसेच वारंवार त्रुटी काढल्या जाणार नाहीत, यासाठीची नियंत्रणात्मक व्यवस्था केली जाईल, देयकांचा लवकरात लवकर निपटारा करण्यात येईल, असे मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!