महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविकेला १५ हजार मानधन आणि मदतनीसांना १० हजार मानधन द्या ! किमान १० हजार महिना वेतन मिळाल्यास कुटुंबात चूल पेटली जाते !!

मुंबई, दि. ३ मार्च – राज्यातील अंगणवाडी सेविकांना अतिशय तुटपुंजे मानधन दिल्या जाते. किमान १० हजार महिना वेतन मिळाल्यास कुटुंबात चूल पेटली जाते. त्यामुळे अंगणवाडी सेविकेला १५ हजार मानधन आणि मदतनीसांना १० हजार मानधन द्या, अशी जोरदार मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज, 3 मार्च रोजी अधिवेशनात केली.

अजित पवार म्हणाले की, पोषण ट्रॅकर अॅपमध्ये अंगणवाडी सेविकांना माहिती भरण्याची प्रणाली इंग्रजीत आहे. मात्र ग्रामीण भागातील कमी शिकलेल्या महिलांचा विचार करून ही माहिती मराठीत भरण्याची सुविधा का केली जात नाही.

ग्रामीण भागात किमान १० हजार महिना वेतन मिळाल्यास कुटुंबात चूल पेटली जाते. गॅसचे दर वाढले असून ग्रामीण भागात रॉकेलही दिले जात नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकेला १५ हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी आग्रही मागणी पवारांनी केली. अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडेही अजित पवारांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य अनेक प्रश्न तळमळीनं मांडतात. सरकारकडून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठका लावण्याचं आश्वासन दिलं जातं. मात्र अनेक मंत्र्यांकडून बैठकाच घेतल्या जात नाहीत, ही बाब संतापजनक आहे.

बैठका लागत नसल्यानं सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत,त्यावर कोणताही मार्ग निघत नाही.त्यामुळे सभागृहात सदस्यांनी बैठका घेण्याचं दिलेलं आश्वासन पाळलं जावं,‍किमान पुढचे अधिवेशन येईपर्यंत तरी बैठकांचं आयोजन केलं जावं.अध्यक्षांनी तसे निर्देश सरकारला द्यावेत, असेही पवार म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!