छत्रपती संभाजीनगर
Trending

मराठी भाषेचा जन्म अजिंठ्याच्या डोंगररांगा व गोदावरी खोऱ्यातील भूभाग अर्थात मराठवाड्यात झाला !

मराठवाडा हीच मराठी भाषेची जननी-प्राचार्य कौतिककराव ठाले पाटील यांचे प्रतिपादन

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ : मराठी भाषेचा जन्म हा अजिंठ्याच्या डोंगररांगा व गोदावरी खोऱ्यातील भूभाग अर्थात मराठवाड्यात झालेला आहे. आजच्या प्रमाण मराठी भाषेत असलेली रूपं ही मराठवाड्याच्या मराठी भाषेतील आद्यरूपं आहेत, असे प्रतिपादन मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.

ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभाग व भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त आयोजित ‘जागर मराठीचा’ या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी मंचावर विभागप्रमुख प्रा. दासू वैद्य, भाषा संचालनालयाचे अनुवादक बाबासाहेब जगताप, कवी हबीब भंडारे व समन्वयक डॉ. कैलास अंभुरे उपस्थित होते.

‘औरंगाबाद जिल्ह्याची साहित्य व सांस्कृतिक परंपरा’ या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले, मराठी भाषा ही अभिजात आहेच. तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे आर्थिक, भाषा व वाङ्मय समृद्धीदृष्टीने योग्य आहे. शालिवाहन काळापासून पैठण हे सर्व सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र होते. तद्वतच बौद्ध धर्माच्या चार केंद्रापैकी अजिंठा हे एक केंद्र होते. मराठी संस्कृती इथे घडली या प्रदेशानेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक नेतृत्व केले. यादवांच्या काळात पहिल्यांदा मराठी ही राजभाषा झाली; परंतु हेमाद्री पंडिताने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथाद्वारे कर्मकांडाचे स्तोम वाढवले.

त्याचा परिणाम नंतरच्या काळातील वाङ्मयीन व सांस्कृतिक नेतृत्वावर झाला. लोकसाहित्याचा जन्मही मराठवाड्यातच झाला, परंतु निजामी राजवटीच्या काळात भाषिक सांस्कृतिक गळचेपीमुळे मराठवाड्यात साहित्य निर्मिती झाली नाही. संस्कृतीबरोबरच साहित्याची आद्यभूमी ही मराठवाडा आहे. अगदी वारकरी संप्रदायात निर्माण झालेली उदात्त सांस्कृतिक परंपरा मराठवाड्यातील बहुजन संतांपासून आलेली आहे. मराठवाड्यातील ब्राह्मण उदार होते म्हणून ते चळवळीत आले. परिणामी मराठवाड्यात ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ निर्माण झाली नाही असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील साहित्य परंपरेचा परामर्श घेतला. संत बहिणाबाई, निळोबाराय, शाहीर विश्राम पाटील यांच्यावर संशोधन होण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विभागप्रमुख प्रा. दासू वैद्य म्हणाले, स्वतःचे नाव, गाव यांनाही एक सांस्कृतिक परंपरा असते. त्या परंपरेची जाणीव असणे गरजेचे आहे आजचे व्याख्यान हा त्याचाच एक भाग आहे. यावेळी अनुवादक बाबासाहेब जगताप यांनी भाषा संचालनालयाचे कार्य व भूमिका विशद केली. याप्रसंगी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराबद्दल कवी हबीब भंडारे यांचा विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास गायकवाड यांनी केले तर डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले.

आज ‘माझा वाचन प्रवास’
‘माझा वाचन प्रवास’ या कार्यक्रमात लेखक तथा माजी उपसंचालक माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार शाहू पाटोळे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार , वित्त व लेखा अधिकारी शरद भिंगारे व आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी नम्रता फलके वाचन प्रवासाविषयी बोलणार आहेत. हा कार्यक्रम मराठी विभागाच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. तसेच ’एमजीएम’ विद्यापीठातील चित्रपट कला विभागाचे प्रमुख, प्रख्यात दिग्दर्शक प्रा.शिव कदम यांचे चित्रपट लेखन विषयक मार्गदर्शन होणार आहे. तसेच अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कारप्राप्त लघुपटांचे सादरीकरण बुधवारी दि.२५ होणार आहे. या संपुर्ण कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!