महाराष्ट्र
Trending

शिर्डी, चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता ! दोन्ही कार्यालयांसाठी प्रत्येकी सहा पदे !!

मुंबई, दि. १३- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या दोन्ही कार्यालयांसाठी प्रत्येकी सहा पदे निर्माण करण्यात येतील. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, सिंदेवाही, नागभिड, ब्रम्हपुरी हे तालुके चंद्रपूर पासून दूर अंतरावर आहेत. त्याचप्रमाणे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा हरितपट्टा देखील असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा दोन भागांत विभागला गेला आहे. यामुळे जनतेची शासकीय कामासाठी पायपीट होते. तसेच विकास कामांनाही विलंब होतो. त्यामुळे चिमूर येथे हे कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अहमदनगर हा जिल्हा राज्यातला क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा असून नागरिकांना महसूलशी संबंधित सर्व कामांकरिता जिल्हा मुख्यालयी जावे लागते. त्यामुळे शिर्डी येथे देखील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा निर्णय घेण्यात आला.

Back to top button
error: Content is protected !!