खुलताबाद येथे ट्रामा केअर सेंटरला मान्यता, सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे निलंबन ! राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचा आराखडा बनवणार !!
सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांची विधानपरिषदेत माहिती
नागपूर, दि. 26 : राज्यातील नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. गरजा वाढत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रासाठी पदभरती, मशीनरी, अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. शिवाय या मोहिमांच्या कामासाठी सर्वकष कृती आराखडा तयार करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील 22 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 68 उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.
डॉ. सावंत यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्राचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने नामंजूर झाला आहे. पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना बऱ्याचवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र परिपूर्ण प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही.
सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे निलंबन
नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या निलंबनाची घोषणाही डॉ. सावंत यांनी केली.
आरोग्य विभागाची जानेवारीत पदभरतीची जाहिरात
आरोग्य विभागामध्ये रिकाम्या जागा असल्याबाबत उपप्रश्नाला उत्तर देताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, आरोग्य विभागाची बिंदूनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्यात असून जागा भरण्यासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय कंत्राटी तत्वावरील एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शिवाय महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या दरात वाढ करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सचिवांची समिती नेमून अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही एका उपप्रश्नाला उत्तर देताना डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील पीएचसीबाबत लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र मान्यतेबाबत निर्णय घेण्याचे निर्देश प्रभारी सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, नरेंद्र दराडे, अभिजित वंजारी, गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.
खुलताबाद येथे ट्रामा केअर सेंटरला मान्यता
सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, शिवाय खुलताबादसह दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन ही पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत. यामुळे खुलताबाद येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
याबाबत सदस्य सतीश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य गोपीचंद पडळकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe