महाराष्ट्र
Trending

महावितरणला ‘सौर ऊर्जे’तील कामगिरीबद्दल पुरस्कार ! पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार व डॉ. संतोष पटनींचाही गौरव !!

मुंबई, दि. १७ : सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग देण्यासाठी सुरु असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणसह पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार व पुणे लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांना पुणे येथे आयोजित ‘सूर्याकॉन’ परिषदेमध्ये गौरविण्यात आले.

सौर ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ व प्रतिनिधींची एकदिवसीय ‘सूर्याकॉन’ परिषद पुणे येथे नुकतीच आयोजित करण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर अपारंपरिक ऊर्जा व भविष्यातील वाटचालीबाबत तीन चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये केंद्र व महाराष्ट्र शासनाचे अपारंपरिक ऊर्जा धोरण आणि महावितरणचा सहभाग या विषयावर चर्चा झाली. या चर्चासत्रात महावितरणकडून सौर ऊर्जा प्रकल्पांबाबत शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सौर ऊर्जा प्रकल्पांना गती देण्यासाठी सुरू असलेले विशेष प्रयत्न, ग्राहक प्रबोधन व जनजागरण, तत्पर सेवा तसेच समाजमाध्यमांचा वापर आदींबाबत माहिती देण्यात आली. त्यात महाराष्ट्र वार्षिक सौर पुरस्कार-२०२३ प्रदान सोहळा झाला.

महावितरणच्या विविध उपक्रमांमुळे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या कार्याची दखल घेत ‘सूर्याकॉन’ परिषदेमध्ये ‘इझ ऑफ डूइंग बिजीनेस फॉर सोलर एजन्सीज’ या श्रेणीत महावितरणला पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ‘लिडरशिप इन पॉलिसी एक्सलेंस’ या श्रेणीत पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, पुणे लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ग्रीन एनर्जीला प्राधान्य देत महावितरणच्या पुणे परिमंडलाकडून सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग देण्यात आला आहे. त्यासाठी गणेशखिंड येथील विश्रामगृहाच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून त्याद्वारे पुणे परिमंडलातील अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

सोबतच सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या एजन्सीजच्या प्रतिनिधींना सर्व तांत्रिक व ‘ऑनलाइन’ प्रशासकीय कार्यवाहीची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासह सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी वीजग्राहकांना इत्यंभूत माहिती देण्यासाठी तसेच विविध शंका निरसनासाठी पुणे परिमंडलाकडून ध्वनीचित्रफित तयार करण्यात आल्या आहेत व त्या महावितरणच्या सर्व समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्या आहेत.

Back to top button
error: Content is protected !!