छत्रपती संभाजीनगर
Trending

जनावरांचा बाजार भरवण्यास बंदी, वाहतूक व शर्यतीवर प्रतिबंध ! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यतील 9 तालुक्यांतील 106 गावांमध्ये 515 जनावरांना लम्पीची बाधा, आता ग्रामपंचायतची जबाबदारी वाढली !!

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे निर्देश

संभाजीनगर लाईव्ह, दि. 4 – जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रार्दुभाव झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा व नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीय सर्व गोवंशीय जनावरे यांची ने-आण करण्यास, वैरण, गवत किंवा अन्य साहित्य, बाधित प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग या क्षेत्राच्या बाहेर नेण्यास तसेच प्राण्यांचे बाजार, प्राण्यांच्या शर्यती व प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यास शासनाकडून लम्पी चर्मरोग नियंत्रणाकरीता जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंध आदेश निर्गमित केले आहेत.

प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम -2009 आणि महाराष्ट्र शासन अधिसूचना 17 जून 2022 अन्वये औरंगाबाद जिल्ह्यातील गोवर्गीय लम्पी चर्मरोगाचा प्रादुभार्वच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणतेही गोवर्गीय जनावरांचे बाजार भरविणे तसेच जिल्ह्यांतर्गत व आंतर जिल्हा वाहतुक करणे व प्राण्यांच्या शर्यती अयोजित करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लम्पी बाधीत जनावरांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यतील 9 तालुक्यातील 106 गावांमध्ये 515 जनावरे बाधीत असुन 76 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून बाधीत क्षेत्रातील जनावरांच्या वाहतुक व खरेदीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. बाधीत जनावरांची माहिती पशुपालकांस ग्रामपंचायत, पशुवैद्यकीय दवाखान्यास देणे बंधनकारक आले आहे. तसेच रोग प्रार्दुभाव झालेल्या जनावरांचे विलगीकरण करावे लागणार आहे.

रोगप्रार्दुभावग्रसत जिल्ह्यामधून ऑनलाईन पद्धतीने होणारी खरेदी विक्री व प्रत्यक्ष वाहतुक प्रतिबंधित करण्यात आलेली आहे. तसेच साथीच्या काळात बाधीत जनावरांचा जिल्ह्यात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामपंचायत) सहाय्याने विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गोठ्यामध्ये आणि परिसरात स्वच्छता व निर्जंतूक द्रावणाची फवारणी करून निर्जंतूकीकरण करण्याचे व रोग व प्रसारास कारणीभूत डास, माशा, गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करण्याचे ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका इ. निर्देशित केले आहे. या आदेशाचे पालन करण्यात यावे असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी निर्देशित केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!