बीड जिल्ह्यात तातडीने संचारबंदी लागू करण्याचे आदेश ! आमदारांच्या बंगल्यातील जाळपोळीनंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिस अॅक्शन मोडवर !!
बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर परिसरात तातडीने संचारबंदी लागू
- शांततेत आंदोलन करा, उद्रेक करू नका असे आवाहन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – माजलगाव आणि बीड शहरातील जाळपोळीनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालय आणि तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर परिसरात तातडीने संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिले असून पोलिस प्रशासनही अॅक्शन मोडवर आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे.
संचारबंदीसंदर्भात बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे म्हणाल्या की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी जाळपोळ झाल्याने संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. सायंकाळपासून हिंसक वळण लागल्याने संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालय आणि ५ किलोमीटर परिसरात ही संचारबंदी लागू असेल, अशी माहितीही जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिली.
बीड जिल्ह्यात आंदोलक जमाव आक्रमक झाला असून एकाच दिवशी दोन आमदारांचे बंगले, बीडमधील सनराईज हॉटेल आणि नगर परिषदेवर जमाव चालून गेला. जमावाने जाळपोळ करून आपला संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरात जमावाने जाळपोळ केली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर तुफान दगडफेकही केली. सहा ते आठ मोटारसायकल आणि तीन कारला पेटवून दिल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी मराठा समाजाच्या टिकणार्या आरक्षणाबाबत उदासीन असून संपूर्ण राज्यात त्यांच्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. हजारों गावांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंदी घातली असतानाच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर आज जमाव चालून गेला. जमावाने जाळपोळ करीत दगडफेक केली. संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ माजलगावमधील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरात जाळपोळ आणि दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर जमाव चालून गेला. जमावाने जाळपोळ केली. दगडफेकही केली. जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. जवळपास सहा ते सात मोटारसायकल या जाळपोळीत कोळसा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या मोटारसायकली गेटच्या आत होत्या.
याशिवाय तीन आलिशान कारही या आगित जळाल्या. आंदोलक इतके आक्रमक झाले होते की, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एक गाडी तर त्यांनी उलटवून लावली. प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार असून सध्या ते अजित पवार गटांत आहेत. जाळपोल आणि दगडफेकीच्या या घटनेमुळे सध्या प्रकाश सोळंके यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जाळपोल आणि दगडफेकीची घटना घडली तेंव्हा आमदार प्रकाश सोळंके हे घरातच असल्याची माहिती मिळतेय.
यानंतर नगर परिषदेत जमाव चालून गेला. तेथे जाळपोळ करण्यात आली. यानंतर बीड जिल्ह्यातच एका हॉटेललाही आग लावण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला पेटवून दिला.
दरम्यान, दगडफेक व जाळपोळ करणारे हे मराठा आंदोलक आहे की आणखी कोणी ? मराठा समाजाला या आंदोलनाच्या आडून बदनाम करण्याचा कोणी डाव रचत आहे का ? याचा शोध घेण्यात येत आहे. मराठा समाज हा शांतेतेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी ओळखला जातो. लाखोंच्या संख्येने ५८ मूक मोर्चे काढणार्या मराठा समाजाची जगाने दखल घेतलेली आहे. दरम्यान, शांततेत आंदोलन करा, उद्रेक करू नका असे आवाहन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe