छत्रपती संभाजीनगरराजकारण

चंद्रकांत पाटलांविरोधात भीमसैनिक आक्रमक, संभाजीनगरात पुतळा जाळला, काळे झेंडे दाखवले, निदर्शने

संभाजीनगर, दि. ११ ः महापुरुषांनी भीक मागून शिक्षण संस्था सुरू केल्या, असे वक्‍तव्‍य करणाऱ्या भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात संभाजीनगरातील भीमसैनिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. क्रांतीचौक, भडकल गेटसह विविध चौकांत निदर्शने करत पाटलांचा पुतळा जाळण्यात आला. काळे झेंडे दाखवण्यात आले. वक्‍तव्‍याबद्दल ॲट्रॉसिटी कायद्यानुसार पाटलांविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी पोलिसांना निवेदन देऊन करण्यात आली.

स्वाभिमानी मराठवाडा प्रतिष्ठानने भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ चंद्रकांत पाटलांचा पुतळा जाळला. या आंदोलनाचे नेतृत्त्व गौतम आमराव यांनी केले. विजय रणभरे, दीपक थोरात, मोहन जोगदंड, कल्पना वाघमारे, स्वाती खिल्लारे, संगिता गायकवाड आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

भारतीय दलित पँथरने सिटी चौक पोलीस ठाण्यात निवेदन दिले. नेते संजय जगताप, माजी नगरसेवक गौतम खरात यांच्या नेतृत्त्वात पोलीस निरिक्षक अशोक गिरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पाटील यांना मंत्रिपदावरून पायउतार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने उस्मानपुऱ्यात पाटील यांच्या पुतळ्याचे दहन केले. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष योगेश बन, प्रभाकर बकले, सुरेश मगरे, मनोज वाहूळ यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. या वेळी पोलिसांनी १३ आंदोलकांना ताब्‍यात घेऊन नंतर सोडून दिले.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरात चंद्रकांत पाटील आरती करण्यासाठी आले होते. आरतीनंतर बाहेर पडल्यावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत काही कार्यकर्त्यांना पकडून सिटी चौक पोलीस ठाण्यात नेले. दोन तासांनी त्यांची सुटका केली. भीमशक्‍तीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्‍तांना भेटून निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दिनकर ओंकार, संतोष भिंगारे, शांतीलाल गायकवाड यांनी नेतृत्त्व केले.

त्रिमूर्ती चौकातही काळे झेंडे दाखवून पाटलांचा निषेध करण्यात आला. बौद्धनगर, उत्तमनगर, भानुदासनगरातील महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुप्टा शिक्षक संघटनेने क्रांती चौकात निदर्शने केली. नेते प्रा. सुनील मगरे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. भास्कर टेकाळे, हेमंत गायकवाड, प्रकाश वाघमारे, अमोल मगरे आदींनी सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!