छत्रपती संभाजीनगरराजकारण

अमित शहा स्वाभिमानी, देवेंद्रजी चाणाक्ष अन्‌ बुद्धिमान!; शिवसेनेच्या या नेत्यानं कौतुक केलं अन्‌ सारेच चक्रावले..!!

संभाजीनगर, दि. ११ ः शिवसेनेचा ठाकरे गट आणि भाजपातील वैरत्व दिवसेंदिवस वाढत चालले असताना, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातून विस्तव जात नसताना, ठाकरे हे सातत्याने अमित शहांवर टीका करत असताना दुसरीकडे त्‍यांच्याच पक्षाचे नेते चंद्रकांत खैरेंना मात्र अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे भलतेच कौतुक आहे. शहा स्वाभिमानी आहेत. फडणवीस चाणाक्ष, बुद्धिमान आहेत… असे साक्षात्‍कार त्‍यांना झाले आहेत. अर्थात हा साक्षात्‍कार उपरोधिक आहे, की खरंच त्यांना तसं वाटतं याची चर्चा सुरू झाली आहे.

काल, १० डिसेंबरला खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतली आहे. बोम्मई हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल उर्मट बोलले. त्‍यांनी बोलावलेल्या बैठकीला जाण्यासही नकार दिला. पण शहा हे त्‍यांचे बॉस आहेत. स्वाभिमानी आहेत. ते बोम्मईंचा बरोबर काटा काढतील, असे खैरे म्हणाले.

सध्या राज्‍यात भाजपचे काय चालले आहे हे कळत नाही. मुद्दाम राज्‍यात गडबड सुरू असून, वातावरण दूषित केले जात आहे. मी देवेंद्रंना सांगेन, राज्‍यात हे खूपच वाईट घडत आहे. तुम्ही लक्ष देत नाही का? देवेंद्रजी तुम्ही चाणाक्ष, बुद्धिमान आहात. या लोकांना आवरा. यात तुमचेच नुकसान होत आहे. गैरसमज आणि वातावरण खराब होत आहे, असे खैरे म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्‍तव्‍य चुकीचे असल्याचेही खैरे म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!