छत्रपती संभाजीनगरपैठण
Trending

बिडकीन पोलिसांनी तुळजापूरच्या हॉटेलला घेराबंदी घालून पैठण तालुक्यातील कवडगावचा आरोपी केला जेरबंद !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – बिडकीन हद्दीतील दरोड्याच्या प्रकरणातील वॉन्डेड आरोपीला बिडकीन पोलिसांनी तुळजापूर (धाराशिव) येथून मुसक्या आवळल्या. पोलिसांना गुंगारा देऊन 12 वर्षापासून तो राहण्याची ठिकाणे बदलत होता. बिडकीन पोलिसांनी तुळजापूर येथून एका हॉटेलला घेरा घालून त्याला जेरबंद केले.

भगिरथ जैन्या काळे (रा. कवडगाव ता. पैठण) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयात पाहिजे/ फरार असलेल्या आरोपीतांसंदर्भातील आढावा घेवून वर्षांनुवर्ष फरार/पाहिजे असलेल्या आरोपीतांचा कसोशिने शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश वरिष्ठांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.

अनेक वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देणा-या आरोपीतांना जेरबंद करण्याची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमे अंतर्गत मे महिण्यात जवळपास 15 पाहिजे असलेले आरोपीतांना जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले आहे. यामध्ये एम पैठण- 04 आरोपी, बिडकीन- 01 आरोपी, पैठण- 02 आरोपी, खुलताबाद – 01 आरोपी, विरगाव -01 आरोपी, चिकलठाणा – 01 पाचोड -01 आरोपी, फुलंब्री – 01 आरोपी, वडोदबाजार – 01 आरोपी, कन्नड ग्रामीण -01 आरोपी, गंगापूर -01 आरोपी असे एकुण 15 पाहिजे असलेले आरोपी जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले आहे.

सन-2011 मध्ये पोलीस ठाणे बिडकीन हद्यीतील ईस्लामपूर येथे दिनांक 29/12/2011 रोजी रात्री 08:30 वाजेच्या सुमारास तक्रारदार यांना एका ज्वारीच्या शेतात नेऊन काठने मारहाण करून व चाकुचा धाक दाखवून 7 दरोडे खोरानी एकूण 66,500/- रुपयांचा माल जबरीने चोरुन नेला होता. त्यांच्या विरुध्द भादंवी कलम 395 अन्वये गुन्हा दाखल होता. यामध्ये 5 दरोडे खोरांनाअटक करण्यात पोलीसांना यश आले होते. परंतु गुन्हा घडल्यापासून यातील आरोपी भगिरथ जैन्या काळे (रा. कवडगाव ता. पैठण) हा मिळून येत नव्हता.

पोलीस त्याचा ठावठिकाणा शोधून काढण्याचा कसोशिने प्रयत्न करत होते. परंतु आरोपी हा पोलीसांना मागील 12 वर्षांपासून त्यांचे स्वत:चे अस्तित्व लपवून व वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदली करून गुंगारा देत होता. तरीही पोलीस आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करत असतांना बिडकीन पोलीसांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की पाहिजे असलेला आरोपी भगिरथ जैन्या काळे हा तुळजापूर येथे स्वत:चे अस्तिव लपवून एका हॉटेलमध्ये काम करत आहे व तो वारंवार त्याच्या राहण्याची ठिकाणे बदलतो.

या मिळालेल्या माहितीच्या आधारे बिडकीन पोलीसांच्या पथकांने तात्काळ तुळजापूर (जि. धारशिव) येथे जावून आरोपी काम करत असलेल्या हॉटेलच्या परिसरात वेशांतर करून सापळा लावला. आरोपी हा हॉटेलमध्ये जात असतांनाच त्याचे ओळखी बाबत खात्री झाल्याने पोलीसांच्या पथकांने त्याला घेराव टाकून झडप घालून जेरबंद केले.

ही कारवाई  मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विशाल नेहुल, उपविभागीय पोलीस अधिकारी, गणेश सुरवसे, सहा. पोलीस निरीक्षक, मनेश जाधव , पो.उप.नि. पोलीस अंमलदार संदिप धनेधर, हनुमान धनवे, कृष्णा आधाट यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!