छत्रपती संभाजीनगर
Trending

दारू ढोसण्यासाठी घरातील भांडे विकले, जाब विचारला म्हणून छातीत वार करून चाकूने भोसकले ! टाऊन हॉल, छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – आठ दिवसांपूर्वी दारू पिण्यासाठी घरातील भांडे विकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून चाकू हल्ला करून छातीवर, बरगडीत वार करून खून केला. ही घटना टाऊन हॉल परिसर, छत्रपती संभाजीनगर शहरात रात्रीच्या सुमारास घडली.

कैलास रामचंद्र वाकेकर (रा. जयभीमनगर, टाऊन हॉल, साई मेडीकलच्या बाजुला छत्रपती संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अजय काशीनाथ चव्हाण (रा. पेठे नगर, लालमाती भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयेश कैलास वाकेकर (वय- 19 वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. जयभीमनगर, टाऊन हॉल, साई मेडीकलच्या बाजुला छत्रपती संभाजीनगर) याने पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, त्याचे काका संदिप वाकेकर यांना दारु पिण्याचे व्यसन असल्याने त्यांची पत्नी व मुले तीन वर्षांपासून माहेरी (डावरगाव ता. पैठण, जि. संभाजीनगर) येथे गेलेली आहेत. तसेच काकाचा मित्र अजय काशीनाथ चव्हाण हा अधून मधून काका सोबत गल्लीत येत होता. त्याला सुध्दा दारु पिण्याचे व्यसन होते.

सुमारे 8 दिवसांपूर्वी काका संदिप वाकेकर व त्यांचा मित्र अजय काशीनाथ चव्हाण (रा. पेठेनगर, लालमाती, भावसिंगपुरा) या दोघांनी जयेश कैलास वाकेकर यांच्या घरातील भांडे विकून दारु पिली होती. त्यानंतर अजय चव्हाण हा त्याचा मोबाइलवरून जयेश कैलास वाकेकर याच्या मोबाईलवर वारंवार फोन करून शिवीगाळ करत होता तसेच धमकी देत होता. त्यामुळे जयेश कैलासचे वडील कैलास रामचंद्र वाकेकर यांनी दि. 10/05/2023 रोजी त्या दोघांना त्याचा जाब विचारुन असे करु नका म्हणून समजावून सांगितले होते.

त्यावेळी अजय चव्हाण याने कैलास रामचंद्र वाकेकर यांना मारण्यासाठी दगड उचलला होता. त्यावेळी तेथील लोकांनी त्यांचे भांडण सोडवले होते. तसेच त्यानंतर सुध्दा अजय चव्हाण हा जयेश कैलास वाकेकर याच्या मोबाईलवर कॉल करुन धमक्या देत होता. दि. 12/05/2023 रोजी सायंकाळी सुमारे 07.00 ते 07.30 वाजे दरम्यान गल्लीत व रोडवर उभा राहून अजय चव्हाण हा कैलास रामचंद्र वाकेकर यांना व कुटुंबियांना हातात चाकू घेवून शिवीगाळ करीत होता. त्यावेळी कैलास रामचंद्र वाकेकर हे बाहेर गेलेले होते.

म्हणुन जयेश कैलास वाकेकर याने वडील कैलास रामचंद्र वाकेकर यांना फोन करुन सांगितले की, अजय चव्हाण येथे चाकू घेवून आला आहे व तो येथे सगळ्यांना शिवीगाळ करत आहे. त्यानंतर कैलास रामचंद्र वाकेकर हे 07.15 वाजेच्या सुमारास मोटार सायकलवरून तेथे एका अनोळखीसोबत आले. त्यावेळी अजय चव्हाण हा त्यांना मारण्यासाठी चाकू घेवून अंगावर धावून गेला. त्यावेळी जयेश कैलास वाकेकर याच्यासह तिघांनी मिळुन अजय चव्हाण यास धरण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्यांना आवरत नव्हता.

त्या झटापटीत त्याने आक्रमक होत चाकुने कैलास रामचंद्र वाकेकर यांच्या उजव्या बाजुला छातीवर तसेच दोन वार डाव्या बरगडीत केले. त्यामुळे कैलास रामचंद्र वाकेकर हे गंभीर जखमी होवून खाली पडले. त्यानंतर अजय चव्हाण घटनास्थळावरून पसार झाला. कैलास रामचंद्र वाकेकर यांना जखमी अवस्थेत रिक्षातून घाटीत नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून 19.55 वाजता त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी मृताचा मुलगा जयेश कैलास वाकेकर याने दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये अजय काशीनाथ चव्हाण (रा. पेठे नगर, लालमाती भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!