राजकारण
Trending

शरद पवार यांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी कॉंंग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा !

मुंबई, दि. २ – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज, २ मे रोजी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याची मोठी घोषणा शरद पवार यांनी आज केली. दरम्यान, सभागृहातच ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या निवृत्तीला प्रचंड विरोध झाला. कोणतीही चर्चा न करता अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यपदावरून निवृत्त होण्याच्या निर्णयामुळे सभागृहातील वरिष्ठ नेत्यांना अश्रु अनावर झाले.

‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी ही घोषणा केल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. कोणतीही चर्चा न करता अचानक हा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रचंड विरोध झाला. शरद पवारांनी फेरविचार करावा, असा सूर यावेळी सर्वांचा होता.

यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख यांच्यासह ज्येष्ठ वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात घोषणा दिल्या. देश का नेता कैसा हो.. शरद पवार जैसा हो.. पवारांनी घेतलेल्या निवृत्तीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी घोषणा सर्वांनी दिली.

दरम्यान, कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की तातडीने निर्णय मागे घ्यावा, यामुळे अजित पवारांनी तातडीने माईकचा ताबा घेतला. समिती ठरवेल तो निर्णय मान्य असेल असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते असतील. ही समिती महाराष्ट्रातील जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातील भावनांचा आदर करून यासंदर्भात निर्णय घेतील, असेही अजित पवारांनी यावेळी जाहीर केले.

Back to top button
error: Content is protected !!