महाराष्ट्र
Trending

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेची कामे निकृष्ट, क्युरिंग न करताच बसवले पाच टनाचे पंप ! विनाअस्तरीकरणामुळे पाइपलाइन फुटण्याचा धोका !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – बहुप्रतीक्षित आणि चर्चित ब्रह्मणगव्हाण उपसा सिंचन योजनेची (टप्पा क्र.१) पाइपलाइन, पंप हाऊसची कामे निकृष्ट दर्जाची सुरु आहेत. यामुळे जलसंपदा विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे काम महिनाभरात पूर्ण करण्याचा दम मंत्र्याने भरल्याने अभियंत्यांनी धसका घेतला असून परिणामी ही कामे बोगस होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना टप्पा क्र.२ ची अंबरवाडीकर यांची निविदा यापूर्वीच रद्द झाली आहे. टप्पा क्र.२ ला ७५० कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही अद्याप कामाचा श्रीगणेशा न झाल्याने मंत्रीमहोदयांनी याच गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे त्यांनी ब्रह्मगव्हाण टप्पा क्र. १ चे पंपहाऊस ते तोंडोळी पर्यंतची साडेतीन कि. मी. लांबीची पाइपलाइन, डिलेव्हरी चेंबर व दोन फुटकळ कालव्यांची कामे हाती घेण्याचे आदेश जलसंपदा विभागास दिले आहेत. महिनाभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्याचे नियोजन असून याचा चांगलाच धसका जलसंपदा विभागाने घेतलेला दिसतो.

पंपहाऊसवर प्रत्येकी पाच टन वजनाचे पंप बसविण्यात आले आहेत. सिमेंटच्या कामाच्या २८ दिवसांच्या क्युरिंगनंतरच पंप बसविणे गरजेचे असताना एका दिवसाच्या क्युरिंगवर अवाढव्य पंप बसविण्यात आल्याने ते ढासळण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पाइपलाइनसाठी आत-बाहेरून अस्तरीकरणाची आवश्यकता असताना अस्तरीकरण न केलेले पाइप अंथरले जात आहेत. हायड्रॉलिक टेस्टमध्येच हे पाइप फुटण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी अनेकदा साइटवर उपस्थित असतात. मात्र, हे सर्व वरिष्ठ अधिकारी या बोगस कामांकडे काना डोळा का करत आहे ? असा सवाल उपस्थित होत आहे. बोगस कामे सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

यापूर्वी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना (टप्पा क्र.२) ते खेर्डा प्रकल्पापर्यंतचे काम करण्यासाठी असेच बोगस पाइप अंथरले होते. हे पाइप फुटल्याचे प्रकरण ताजे असताना त्याची पुनरावृत्ती या कामात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Back to top button
error: Content is protected !!