देश\विदेश
Trending

Budget 2023: शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर, राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय स्थापन करण्याची घोषणा !

जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांद्वारे शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा सुधारित कार्यक्रम करणार सुरू

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2023 : सरकारच्या ‘सबका साथ सबका विकास’ या तत्त्वज्ञानानुसार विकास सर्वसमावेशक असावा, असे मत केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केले.

केंद्रीय अर्थसंकल्पामध्‍ये सात प्राधान्यक्रम देण्‍यात आले आहेत. ते एकमेकांना पूरक कार्यरत असणार आहेत. हे ‘सप्तऋषी’ म्हणून अमृत कालाद्वारे आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वसमावेशक विकास हे सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. यामध्ये जनतेचे आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य यांचा समावेश आहे, असे अर्थमंत्री म्हणाल्या.

शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर देताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, शिक्षकांच्या प्रशिक्षणाची पुनर्कल्पना मांडण्‍यात येणार आहे. यामध्‍ये नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र, अभ्यासक्रम व्यवहार, निरंतर व्यावसायिक विकास, मापदंड मोजणारे सर्वेक्षण आणि आयसीटी म्हणजे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली जाईल. यासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांना उत्कृष्ट संस्था म्हणून विकसित केले जाईल, असेही त्या म्हणाल्या.

बालगटासाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय स्थापन करण्याची घोषणा मंत्र्यांनी केली. भौगोलिक, भाषा, विविध शैली आणि स्तरातील दर्जेदार पुस्तकांची उपलब्धता आणि उपकरण सुलभता निर्माण करण्‍यात येईल, असे सीतारामन यांनी सांगितले. पंचायत आणि प्रभाग स्तरावर मुलांसाठी ग्रंथालये स्थापन करण्यात येतील आणि राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाची सामुग्री सर्व मुलांना उपलब्‍ध करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी सर्व राज्यांना प्रोत्साहित केले जाईल.

वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि महामारीच्या काळात शिक्षणाचे जे नुकसान झाली आहे, ते भरून काढण्यासाठी नॅशनल बुक ट्रस्ट, चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट आणि इतर स्त्रोतांना प्रादेशिक भाषा आणि इंग्रजीमध्ये अभ्यासक्रमेतर पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असेही मंत्र्यांनी सांगितले. साक्षरतेसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य देखील या उपक्रमाचा एक भाग असेल, असेही त्या म्हणाल्या.

Back to top button
error: Content is protected !!