छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

९७ कोटींच्या घोटाळ्यातील फरार मुख्य सूत्रधार माजी आमदार सुभाष झांबड यांच्या कंपनीकडून महापालिकेने २० लाखांचा कर वसूल केला !

Zambad Disha Pride infrastructures LLP या कंपनीकडून २० लाखांचा मालमत्ता कर वसुल

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणार्या अजिंठा अर्बन बॅंकेतील ९७.४१ कोटींच्या महाघोटाळ्यातील फरार मुख्य सूत्रधार बॅंकेचे चेअरमन तथा माजी आमदार सुभाष मानकचंद झांबड हे सध्या फरार असले तरी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या जाबाज अधिकार्यांनी त्यांच्या कंपनीकडून तब्बल २० लाखांचा मालमत्ता कर वसुल केला आहे. Zambad Disha Pride infrastructures LLP तफे॔ सुभाष मानकचंद झांबड यांच्या कडून महानगरपालिकेने हा २० लाखांचा कर वसूल केला आहे.

कर निर्धारक व संकलक व OSD जाधव यांच्या आदेशानुसार तसेच सहाय्यक आयुक्त बिरारे, कार्यालयीन अधीक्षक जयवंत कुलकर्णी, ठोकळ. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्र. I 8 वार्ड 115 सातारा येथे रु. 2000000/- इतका मालमत्ता कर मे. झांबड दिशा LLP तफे॔ सुभाष मानकचंद झांबड यांच्या कडून वसूल करण्यात आला आहे. सदरील ठिकाणी पथक प्रमुख. अशोक भोजने, वसुली कर्मचारी, प्रेमनाथ मोरवाल, वैभव कुंडलवाल, महेश वाघ आदी कर्मचारी हजर होते.

अजिंठा अर्बन बॅंकेतील असा आहे घोटळ्याचा गुन्हा- अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद चे 1) सुभाष मानकचंद झांबड, (चेअरमन), 2) प्रदीप एकनाथ कुलकर्णी (मुख्य कार्यकारी अधिकारी), 3) सतीश मोहरे (सनदी लेखापाल), आणि दिनांक 01/03/2006 रोजी 10.30ते दिनांक 30/08/2023 रोजी 5.30 या कालावधीतील संचालक मंडळ, अधिकरी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून कर्जदारांना विनातारण कर्ज दिली. तसेच खोट्या व बनावट नोंदी घेवून खोटा हिशेब तयार करून बँकेची सुमारे 97.41 कोटी रूपये रक्कमेचा अपहार करून आर्थिक फसवणुक केल्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून आर्थिक गुन्हे शाखा त्याचा तपास करत आहे.

यासंदर्भात अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे (वर्ग-1, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, सहकारी संस्थेच्या कार्यालयातून छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण व अनुषंगीक कामकाजाचे नियंत्रण करण्यात येते. त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला देण्यात येतो. अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, या कार्यालयाच्या दिनांक 31/08/2023 अन्वये प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांना अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद” या बँकेचे प्रशासक म्हणून नेमले आहे. दिनांक 31/08/2023 रोजी काकडे यांनी बँकेचे मुख्य कार्यालय झांबड हाईटस, जाधवमंडी येथे बँकेचा प्रशासक पदभार स्वीकारलेला आहे. बँकेचे जाधवमंडी व उस्मानपुरा येथे बँक शाखा आहेत.

खोट्या व बनावट मुदतठेव दाखवून कर्जदारांना खैरात वाटली – भारतीय रिझर्व्ह बँकेचे दिनांक 28/08/2023 रोजीच्या पत्रानुसार अंजठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद या बँकेच्या लेखापरिक्षीत आर्थिक स्थितीत मुल्यांकन केलेल्या नेटवर्थ ( स्वनिधी) आणि सी. आर. ए. आर. (भारीत मालमत्ता प्रमाण) मध्ये खुप मोठा फरक आहे. नेटवर्थ रुपये (-) 70.14 कोटी आणि सी. आर. ए.आर मध्ये रुपये (-) 38.30 कोटी एवढे आहे. तसेच अनेक कर्जदारांचे नावे कोट्यवधी रुपये खोट्या व बनावट मुदतठेव दाखवून सदर मुदत ठेव तारण दाखवून कर्जधारकांना असुरक्षित कर्ज दिले.

अजिंठा अर्बन को. ऑप. बँक लि. औरंगाबादचे चेअरमन सुभाष मानकचंद झांबड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप एकनाथ कुलकर्णी, दिनांक 01/03/2006 ते 30/08/2023 या कालावधीतील बँकेचे संचालक मंडळ, व बँकेचे इतर जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून कर्जदारांना विनातरण कोट्यवधींचे कर्ज वाटप केले. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत.

याप्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. सुरुवातीला दोघे व त्यानंतर जाधवमंडी आणि उस्मानपुरा शाखेचे शाखा व्यवस्थापक यांच्यासह तीघांना मागील आठवड्यात अटक करण्यात आलेली आहे. एकूण पाच जणांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली असून मुख्य सूत्रधार सुभाष झांबड हे फरार आहेत.

Back to top button
error: Content is protected !!