देश\विदेशमहाराष्ट्र
Trending

छत्रपती संभाजीनगर ते पुणे आणि पुणे-बंगळुरू दोन्ही रस्ते प्रकल्प लवकरच पूर्ण करणार !

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार- नितीन गडकरी

पुणे दि.१२: पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यात ५० हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू आणि पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पुणे शहरात एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प तसेच खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, येणाऱ्या काळात पुणे हे देशाच्या विकासाचे केंद्र होणार आहे, पुणे अनेकांना रोजगार देणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांधिक वेगाने विकसित होणारं शहरही पुणेच आहे. चोवीस तास पाणी आणि उत्तम रस्ते पुण्यासाठी आवश्यक आहेत. भारत सरकारच्यावतीने निश्चितच पुण्याचा विकासासाठी सहकार्य करण्यात येईल. पुण्यातील प्रकल्पांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल.

पुणे-सातारा महामार्गावरील दुमजली डबलडेकर पूल, हडपसर-यवत उन्नत मार्ग, पुणे-शिरूर-अहमदनगर ५६ किलोमीटरचा मार्ग, तळेगाव-शिक्रापूर-चाकण ५४ किलोमीटरचा मार्ग आणि नाशिक फाटा ते खेड मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार आहे. पुणे विभागात पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आले असून त्यातील काही पूर्ण झाले आहेत. १२ हजार कोटींचे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग डिसेंबर अखेर पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले.

शहरातील प्रदूषण कमी करा- गडकरी म्हणाले, चांदणी चौक प्रकल्पासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मोठ्या प्रकल्पांवरील खर्च आणि वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. पुण्यात हवेतून चालणाऱ्या एअर बसेसबाबतही पर्याय म्हणून अभ्यास करावा. पुण्यातील ऑटो रिक्षांना नवे परवाने देताना इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर चालणाऱ्या रिक्षांना परवाने दिल्यास प्रदूषण कमी होईल.

ग्रीन हायड्रोजन हे भविष्य असल्याने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचा विचार व्हावा. पुण्यातील सर्व कचऱ्याचे विलगीकरण करून पुणे चक्राकार मार्गासाठी वापरल्यास कचऱ्याची समस्या दूर होईल. पुण्यातील अशुद्ध पाणी शुद्ध करून उद्योग, शेती आणि रेल्वेला दिल्यास जलप्रदूषण दूर होण्यास मदत होईल. शहरातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासोबत शहरातील प्रदूषण दूर करण्यावर अधिक भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्य शासनाने नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून सोलापूर, पुणे आणि नाशिक सारख्या शहरातील रस्ते प्रकल्पाच्या कामांसाठी भूसंपादन वेगाने झाले. चांदणी चौकातील प्रकल्पासाठीही या निर्णयाचा उपयोग झाला. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांनीही चांगले काम केल्याचे गडकरी म्हणाले.

एकात्मिक वाहतूक व्यवस्था गरजेची-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे मेट्रोने ‘पुणे वन कार्ड’ द्वारे चांगली सुरुवात केली आहे. हे कार्ड पीएमपीएमएललाही लागू होईल अशी व्यवस्था केल्यास त्याची उपयुक्तता वाढेल. भविष्यात देशातील इतर मोठ्या शहरातही या कार्डचा उपयोग होऊ शकेल. पुण्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करून ५०० मीटर वर नागरिकांना विविध वाहतूक पर्याय दिल्यास ते सार्वजनिक वाहतुकीचा जास्त उपयोग करतील. आता स्मार्ट सिस्टीम तयार करण्यात येणार असल्याने बसेसची वेळ, स्थान, प्रवासी संख्याही कळू शकेल.

पुण्यात १० किलोमीटर जाण्याचा वेळ ३० ते ४० मिनिटे आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. पुण्यातून वेगवेगळ्या शहरात जाणाऱ्या रस्त्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते. उन्नत रस्ते तयार करून ही समस्या दूर करता येईल. केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून यासाठी राज्य शासनही यासाठी आपला वाटा उचलेल.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि प्रकल्पाच्या आवश्यक भूसंपादनासाठी महानगरपालिकांना निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक भूसंपादनासाठीही निधी देण्यात आला आहे. पुण्यात पायाभूत सुविधांचा विकास झाल्यास या भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल. त्यादृष्टीने पुण्यात नवे विमानतळ होणे गरजेचे आहे. पुरंदरला विमानतळ होण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व मान्यता मिळाल्या आहेत. भूसंपादनासाठी लवकरच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेण्यात येईल. पुण्यातील अनेक क्लस्टरसाठी हे कार्गो वरदान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुळा मुठा शुद्धीकरण प्रकल्पामुळे शहरातील आणि शेतीसाठी पाण्याची समस्या दूर होईल. पुण्यातील कचरा व्यवस्थापन आणि विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात पुणे देशातील सुंदर आणि राहण्यायोग्य शहर होईल, असेही फडणवीस म्हणाले.

मेट्रोच्या कामांना गती देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे ही समस्या दूर करण्यात यश आले. भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनानेही चांगले प्रयत्न केले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, पोलीस आणि नागरिकांचेही सहकार्य लाभले. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामालाही गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वनाज ते चांदणी चौक आणि वाघोलीपर्यंतही मेट्रो कमीत कमी कालावधीत पोहोचवायची आहे.

पुणे शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शहरातील पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्याने पुणे शहराला त्याचा लाभ होणार आहे. पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग येत असल्याने रस्ते, मेट्रो, विमान वाहतूक अधिक सक्षम करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. पुणे अंतर्गत चक्राकार मार्गाची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य शासन आणि पुणेकर यासाठी सर्व सहकार्य करतील असेही पवार म्हणाले. यावेळी आमदार भीमराव तापकीर यांनीही मनोगत व्यक्त केले. केंद्र आणि राज्याने प्रकल्पासाठी पुरेसा निधी दिल्याने चांदणी चौकातील रस्ते प्रकल्प पूर्ण होऊन वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत झाली असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. महामेट्रोतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘पुणे वन कार्ड’चे लोकार्पणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, राहुल कुल, सुनिल कांबळे, संजय जगताप, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

असा आहे एकात्मिक पायाभूत सुविधा व रस्ते विकास प्रकल्प
पुणे शहरात एनडीए चौकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वर सर्व मार्गिकांसहित एकूण १६.९८ किलोमीटर लांबीचा पायाभूत सुविधा व रस्ते विकास प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाची किंमत ८६५ कोटी असून प्रकल्पामुळे परिसरात अखंड आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक सहा पदरी करण्यात आली असून अंतर्गत आणि बाह्य सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ८ वेगवेगळ्या मार्गिकांची उभारणी करण्यात आली आहे.

मुळशी-सातारा, मुळशी-मुंबई, मुळशी-पाषाण, सातारा/कोथरूड-मुळशी, पाषाण-मुंबई, पाषाण-सातारा, सातारा/कोथारूड-पाषाण आणि मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्याकडे अशा आठ मार्गिका आहेत.

एनडीए ते पाषाण ओव्हरपास आणि पाषाण ते मुंबई तसेच सातारा/कोथरूड ते मुळशी असे दोन अंडरपासही करण्यात आले आहेत.

एनडीए चौकात येणारी सर्व बाजूंची वाहतूक सिग्नलमुक्त करण्यात आली आहे. जून्या पुलाच्या ठिकाणी नवा विस्तारीत पूल उभारण्यात आला आहे. परिसराचे सुशोभिकरणही करण्यात येत आहे.

खेड आणि मंचर येथील वळण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची लांबी १४.१३७ किलोमीटर असून प्रकल्पाची किंमत ४९५ कोटी आहे.

Back to top button
error: Content is protected !!