महाराष्ट्र
Trending

सभा रद्द झाल्याबाबतच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या, शरद पवारांच्या सभेनंतर बीडमध्ये अजितदादा गटाच्या सभेचा धुरळा उडणार ! दादांची तोफ कुणावर धडाडणार, याकडे सर्वांच्या नजरा !!

बीड, दि. १९ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली.

ही सभा रद्द झाल्याबाबत माध्यमांवर येणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असून माध्यम प्रतिनिधींनी कृपया खात्री केल्याशिवाय सभेबद्दल अशा चुकीच्या व निराधार बातम्या देऊ नयेत, अशी विनंतीही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येवला येथे पहिली जाहीर सभा घेऊन पक्षाची भूमीका स्पष्ट केली होती. भाजपासोबत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर मराठवाड्यात पहिली सभा बीड येथे घेऊन शरद पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शरद पवारांनी राष्ट्रवादीतील अजितदादा या गटावर प्रत्यक्ष टीका टाळली. नामोल्लेख टाळून त्यांनी टीका केली. ज्यांनी घडवलं त्यांच्याबद्दल माणूसकी दाखवा असा टोलाही पवारांनी लगावला होता.

शरद पवारांच्या या सभेनंतर अजितदादा गटाचीही जाहीर सभा होणार असल्याची बातमी धडकली. दरम्यान, माध्यमांनी सूत्रांचा हवाला देत ही राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या अजित दादा गटाची सभा रद्द करण्यात आल्याची बातमी चालवण्यात आली. शरद पवारांनी अजित दादा गटांवर थेट हल्ला चढवला नसून त्यावर काय उत्तर देणार ? यासंदर्भात अजितदादा गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही सभा घेऊ नये असा सल्ला दिल्याच्या बातम्या टीव्हीवर येऊ लागल्या. ही सभा रद्द करण्यात आल्याचेही बातमीपत्रात नमूद करण्यात आले. मात्र, खुद्द कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावर स्पष्टीकरण देत या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असून सभा होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या संभेत अजितदादा गटांची तोफ कुणावण धडाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button
error: Content is protected !!