छत्रपती संभाजीनगर
Trending

डबल धमाका स्किममध्ये २७ लाखांचा घोटाळा ! भारत बाजारमधील AS Ventures कार्यालयाच्या माध्यमातून २२ ग्राहकांना गंडा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – सध्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमधील २०० कोटींचा घोटाळा गाजत असतानाच आता पुन्हा एक वेगळा घोटाळा समोर आला आहे. शेअर मार्केट आणि इन्व्हेसमेंटच्या नावाखाली सुरुवातीला चांगला परतावा देऊन नंतर २२ ग्राहकांचे तब्बल २७ लाख ५० हजार घेवून फसवणूक झाली आहे. मध्यप्रदेशमधील एका भामट्याने छत्रपती संभाजीनगरच्या एका महिलेला भूल थापा मारून तिच्या माध्यमातून ही रक्कम गिळंकृत केली. छत्रपती संभाजीनगरच्या महिलेने भारत बाजार येथे AS Ventures या नावाने कार्यालय स्थापन केले. या कार्यालयातून या महिलेने तिच्या ओळखीच्या लोकांकडून इन्व्हेस्टमेंट जमा केली. आणि मध्यप्रदेशच्या भामट्याने ती लंपास केली.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात फिर्यादी महिलेने दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, AS Ventures (भारत बाजार, प्रोझोन मॉलच्या बाजुला, छत्रपती संभाजीनगर) याठिकाणी जुलै 2021 पासून शेअर मार्केटचे ऑफिस सुरु केले. सदर ठिकाणी फिर्यादी महिला ट्रेडींग, इन्वेस्टमेंट, म्युच्यअल फंड, बिझनेस लोन, पर्सनल लोन इत्यादी काम पाहते. फिर्यादी महिला व त्यांच्या क्लायंट(ग्राहक)ची आरोपी अखिल सिंह (सौरभ ) रा. मध्यप्रदेश याने फसवणुक केल्याचे म्हटले आहे.

सविस्तर असे की, एप्रिल 2021 मध्ये फिर्यादी महिला तिच्या राहात्या घरातून शेअर मार्केटचे ऑनलाईन क्लास करत होती. सदरचे क्लास करीत असताना मित्र मैत्रिणीकडून सदर फिर्यादी महिलेला अखिल सिंह (सौरभ) रा. मध्यप्रदेश याच्याविषयी माहिती मिळाली व तो शेअर मार्केटचे काम करतो, असे समजले होते. फिर्यादी महिलेने त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो म्हणाला की, मी IIFL कंपनीमध्ये आहे. त्यावेळी फिर्यादी महिलेने त्याच्याकडे शेअर मार्केटविषयी विचारणा केली असता त्याने फिर्यादी महिलेला सुरुवातीला एक ऑफिस चालू करण्याचे सांगितले होते.

सुरुवातीला एका महिन्यात २० हजारांचे ३० हजार – फिर्यादी महिलेने मध्यप्रदेशच्या त्या भामट्याला ट्रेडिंगकरीता 20 हजार रु. दिनांक 22/04/2021 रोजी त्याच्या फोन पे क्रमांकावर पाठविले असता त्याने महिन्याच्या कालावधीमध्ये तीस हजार रुपये रिटर्न्स फोन पे द्वारे दिला. दरम्यान त्याने 6 मे 2021 रोजी त्याने फोन पे 70 हजार पाठवून दिले व परत 7 में 2021 रोजी परत पाठविण्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे फिर्यादी महिलेने त्याला ते पाठवुन देखील दिले होते. सदरच्या व्यवहारामळे फिर्यादी महिलेच्या त्याच्यावर विश्वास बसला होता.

भामट्याने सांगितल्यानुसार थाटले भारत बाजारला कार्यालय- मध्यप्रदेशच्या त्या भामट्याने सांगितलेप्रमाणे फिर्यादी महिलेने जुलै 2021 मध्ये भारत बाजार, प्रोझोन मॉलच्या बाजुला, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी AS Ventures नावाचे शेअर मार्केटचे ऑफिस चालु केले होते. सदरचे ऑफिस चालु केल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी अखिल सिंह व सोबत एक महिला व एक पुरुष असे तिघे जण आले होते. त्यामधील महिलेचे नाव हे निहारीका अग्रवाल असे सांगितले होते व तिचा मोबाईल दिला होता. तसेच अखिल सिंह याने त्याचे आधार कार्ड दिले असता त्याचा फोटो फिर्यादी महिलेने काढून घेतला होता. त्यामध्ये त्याचे नाव हे अखिल दिलीप सिंह, पत्ता ग्राम पोस्टे सलैया सिहोरा, कटनी, मध्य प्रदेश असा होता. त्यावेळी अखिल सिंह याने फिर्यादी महिलेला सांगितले की, “निहारीका एक हमारी टिम की अकाउंट मॅनेजर है, और इसके बाद कॅश व्यवहार यही देखेगी आपके क्लायंट जो भी इन्वेस्टमेंट स्कीम की अमाउंट और प्रॉफिट लॉस का पैसा यह सब कॅश मे देनेका और आपको भी कॅश मे मिलेगा.” तसेच त्यावेळी अखिल सिंह याने मंथली इन्वेस्टमेंट स्कीम सांगितली होती. त्यामध्ये इन्वेस्टमेंट करणाऱ्या व्यक्तीस मंथली परतावा दिला जाईल.

काही दिवसांतच एकूण 18 क्लायंटने एकूण 15 लाखांची गुंतवणुक- सदर स्कीममध्ये 30,000/- रु. ला 1,00,000/- आणि रु. 50,000/- रु. 1,50,000/- व 1,00,000/- रु. ला 3,00,000/-रु. याप्रमाणे परतावा मिळेल असे सांगितले होते. त्यानंतर सदर स्कीमबाबत फिर्यादी महिलेने तिच्या जवळच्या नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांना माहिती दिली असता ज्यांना सदरची मंथली इन्वेस्टमेंट स्कीम आवडली त्यांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे तीस हजार, पन्नास हजार व एक लाख याप्रमाणे स्कीममध्ये गुंतवणुक केली होती. सदरच्या स्कीममध्ये फिर्यादी महिलेकडे काही दिवसांतच एकूण 18 क्लायंटने एकूण 15 लाखांची गुंतवणुक केली होती.

सदरची जमा होणारी रोख रक्कम ही फिर्यादी महिला अखिल सिंह याची अकाउंट मॅनेजर निहारीका ही फिर्यादी महिलेच्या ऑफिसला येवून घेवून जात होती. तसेच निहारीका ही सदर क्लायंटला महिन्याला मिळणारा परतावा देखील रोख स्वरुपात देवून जात असे. प्रत्येक वेळी निहारीका ही तिच्यासोबत वेगवेगळ्या व्यक्तीला घेवून येत होती.

डबल धमाका स्किम- डिसेंबर 2021 मध्ये अखिल सिंह याची अकाऊंट मॅनेजर निहारीका अग्रवाल हिने सांगितले की, “हमारे सर अखिल सिंह ने आपको डबल धमाका स्कीम के बारे में बताने को कहा है, उसमे इन्वेस्टर को चार महिने मे डबल अमाउंट मिलेगा. ” त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये मी एक क्लायंट चे 50 हजार रुपयाची रक्कम या डबल धमाका स्कीममध्ये गुंतवणुक केली असता जून 2022 मध्ये सदर क्लायंटला एक लाख मिळाले. तसेच मार्च, एप्रिल, मे असे प्रत्येक महिन्यामध्ये एक-एक क्लायंटने सदर स्कीममध्ये गुंतवणुक केली होती व त्यांना त्याचा परतावा देखील मिळाला होता.

डबल धमाका स्कीममध्ये एकूण 22 क्लायंट- त्यानंतर त्यांनी सदरच्या डबल धमाका स्कीमचा कालावधीमध्ये वाढ करून सहा महिन्याचा केला तसेच त्यानंतर आठ महिने व परत कालावधी चार महिने याप्रमाणे त्यांनी कालावधीमध्ये बदल केला होता. सदरच्या डबल धमाका स्कीममध्ये माझ्याकडे एकूण 22 क्लायंट यांनी एकूण 27,50,000/- रु. गुंतवणुक केलेली असून सदरची रक्कम क्लायंटकडून फिर्यादी महिलेकडे जशी जशी जमा होईल त्याप्रमाणे फिर्यादी महिला अखिल सिंह यांची अकाउंट मॅनेजर निहारीका अग्रवाल हिच्याकडे रोख स्वरुपात कार्यालयातच दिलेली आहे. 10 मार्च 2023 मध्ये निहारीका हिने त्यांच्याकडे चालु असलेल्या मंथली इन्वेस्टमेंट स्कीमचा परतावा रोख स्वरुपात दिला होता व त्यावेळी काही क्लायंट धमाका स्कीमचा परतावा मिळणार होता तो तिने दिला नाही. तो टॅक्स काढून 12 मार्च रोजी देणार आहे, असे सांगुन निघुन गेली व परत आली नाही.

ग्राहकांचा तगादा वाढल्यानंतर दोन्ही आरोपींचे मोबाईल बंद- त्यानंतर क्लायंट हे गुंतवणुकीच्या परताव्याकरीता विचारणा करु लागले असता फिर्यादी महिलेने निहारीका अग्रवालला मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद मिळून आला. त्यानंतर अखिल सिंह याचा मोबाईल देखील बंद असल्याचे समजले. त्यानंतर फिर्यादी महिलेने अनेकवेळा त्या दोघांनाही फोन केले असता त्यांचे फोन बंद मिळून येत असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. तसेच परतावा परत न मिळाल्याने क्लायंट हे फिर्यादी महिलेच्या ऑफिसमध्ये येवून तसेच फोन करून विचारणा करु लागल्याने त्यांना फिर्यादी महिलेने सदरची हकीकत सांगितली.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनमध्ये अखिल सिंह व त्याची अकाउंट मॅनेजर निहारीका अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!