छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे या शैक्षणिक वर्षाचे अकॅडमिक कॅलेंडर जाहीर ! गुरुवारपासून विद्यापीठ, महाविद्यालयांच्या शैक्षणिक सत्रास प्रारंभ !!

शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच परीक्षा, दीक्षांतसोहळा, युवकमहोत्सवाची तारीखही जाहीर !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचे ‘अकॅडमिक कॅलेंडर’ जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे परीक्षा, दीक्षांत समारंभ व युवक महोत्सवाच्या तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत.

विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक वेळापत्रक तंतोतंतपणे पार पाडण्यासाठी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी नियोजन केले आहे. विद्यापीठाचा छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबाद येथील पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांचे २०२३-२४ या वर्षाचे अकॅडमीक कॅलेंडर बुधवारी (दि. १४) घोषित करण्यात आले. कुलगुरू डॉ .प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत सदर कॅलेंडर मंजूर करण्यात आले. अधिष्ठाता मंडळाने सदर कॅलेंडर तयार केले.

प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. प्रशांत अमृतकर , डॉ. वाल्मिक सरवदे, सदस्य सचिव डॉ. सचिन देशमुख, परीक्षा मंडळ संचालक डॉ. भारती, गवळी, उपकुलसचिव डॉ . संजय कवडे आदींनी यात सहभाग घेतला. नवीन वेळापत्रकानुसार १५ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत हे सत्र सुरू राहील. २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठ वर्धापन दिनाचे कार्यक्रम होतील. तर केंद्रिय युवक महोत्सव १४ ते १७ सप्टेंबर या दरम्यान होणार आहे.

गेल्या वर्षीच्या युवक महोत्सवात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी सांगता व बक्षीस वितरण करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी घोषित केले होते. त्याची अंमलबजावणी यंदापासून करण्यात येणार आहे. १३ ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या दरम्यान प्रथम सत्राच्या परीक्षा होतील . तर ६ ते २७ दिवाळीच्या सुट्टी राहतील. ५ ते २६ नोव्हेंबर दरम्यान दिवाळीच्या सुट्टया राहतील. २८ नोव्हेंबर ते २५ एप्रिल या काळात द्वितीय सत्र असेल. २६ मार्च ते २५ एप्रिल या दरम्यान द्वितीय सत्राच्या परीक्षा होतील.

१४ जानेवारी रोजी नामविस्तार दिनाचे कार्यक्रम होतील. तर २६ एप्रिल ते १४ जून या दरम्यान आगामी वर्षातील उन्हाळी सुट्टया असणार आहेत. विशेष म्हणजे या वेळापत्रकात विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. वर्षभरातील संपूर्ण महत्वाचे नियोजन प्रारंभिच करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापक यांना य अध्ययन, अध्यापन सुलभ होणार आहे. गेल्या सत्रात १ मे ते १४ जून दरम्यान उन्हाळी सुट्टी होती. गुरुवार, १५ जूनपासून नवीन वर्ष सुरु होत आहे ,असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ.संजय कवडे यांनी कळविले आहे.

शैक्षणिक, प्रशासकीय शिस्तही गरजेची : कुलगुरू
गेल्या चार वर्षांत विद्यापीठाला शैक्षणिक व प्रशासकीय शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याला यशही येत आहे.येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेशापासून ते परीक्षा ,निकालापर्यंत व अध्यापनापासून ते सर्व प्रकारच्या स्पर्धा , युवक महोत्सव याचे नियोजन सत्राच्या आरंभीच करण्यात आले आहे. या वेळापत्रकाचे तंतोतंत व काटेकोरपणे पालन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!