छत्रपती संभाजीनगर
Trending

कुलगुरुंचा ८० टक्के महाविद्यालयांना दणका: ४७१ महाविद्यालयांची विद्यार्थी क्षमतेसह यादी प्रसिध्द ! ३९३ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया स्थगित, ५३४ अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता घटवली !!

विद्यार्थी, पालकांनी मान्यता पाहुनच प्रवेश घ्यावा

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ३७१ महाविद्यालयांची मान्यताप्राप्त अभ्यासक्रम व प्रवेशासाठी मान्य जागांसह (इनटेक कॅपॅसिटी) यादी ३१ मे रोजी सायंकाळी प्रसिध्द करण्यात केली आहे. पूर्णवेळ प्राचार्य,, कुशल मनुष्यबळ व पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांच्या कोर्सेसची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात आली असून काही कोर्सेसची क्षमता घटविण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे.

शैक्षणिक विभागाच्यावतीने संलग्नित महाविद्यायांसाठीची सर्व माहिती अद्यवायत करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक विभागाने संलग्नित महाविद्यालयासंदर्भात विविध निर्णय घेतले आहेत. महाविद्यालयांचे सर्व शुल्क ऑनलाईन पध्दतीने जमा करून घेण्यात येत आहे. अकॅडमिक ऑडीट करून घेण्यात येत आहे. परंपरागत अभ्यासक्रमांच्या चार महाविद्यालयांचे प्रवेशही थांबविण्यात आले.

तसेच विद्यापीठांशी संलग्नित ३३ व्यावसायिक महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी अपात्र ठरविण्यात निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये चार जिल्हयातील बीएड, बीपीएड व विधि शाखेतील महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच अनेक महाविद्यालयांची अनियमितता आढळल्यास आर्थिक दंडही सुनावण्यात आला आहे. पूर्ण प्राचार्य, पूर्णवेळ प्राध्यापकांची नियुक्ती, पायाभूत सुविधांचा अभाव तसेच अकॅडमी ऑडिटमध्ये नो ग्रेड मिळालेल्या महाविद्यालयांच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे.

८० टक्के महाविद्यालये प्रभावित– शैक्षणिक वर्षात २०२३ -२४ यासाठीची संलग्नित ४७१ महाविद्यालयांची यादी आज घोषित करण्यात आली. या यादीनूसार महाविद्यालयात एकूण १९०० पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सध्या सुरू आहेत. यापैकी ३७२ महाविद्यालयांच्या ३९३ अभ्यासक्रमांची प्रवेश पूर्णतः थांबविण्यात आले आहेत. तर ५३४ अभ्यासक्रमांचे प्रवेश घटविण्यात आले आहेत. तर १९०० पैकी ९७३ अभ्यासक्रमांनाच पूर्ण क्षमतेने प्रवेश देता येणार आहेत.

या संदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्यांना शैक्षणिक विभागाच्यावतीने पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, कुलगुरू यांच्या आदेशानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व संलग्नित महाविद्यालयांना कळविण्यात येते की, संबंधित महाविद्यालयामध्ये उपलब्ध पायाभूत सुविधा नॅक मूल्यांकन, शैक्षणिक अंकेक्षण, अध्यापक नियुक्ती व इतर तत्सम बाबीच्या आधारे सन २०२३ – २४ साठी तात्पुरती संलग्नता यादी (Provisional List) तयार करण्यात आली असून सदरील यादी विद्यापीठाच्या www.bamu.ac.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे.

सर्व संबंधित महाविद्यालयांनी संबंधित यादीचे अवलोकन करून या तात्पुरत्या यादीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास दिनांक ०५ जूनपर्यंत आवश्यक त्या दस्तावेजासह लेखी स्वरुपात त्रुटी आक्षेप अर्ज विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागामध्ये सादर करावे. विहित मुदतीनंतर आलेल्या त्रुटी आक्षेप अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, याची कृपया सर्व संबंधित महाविद्यालयानी नोंद घ्यावी, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ.श्याम सिरसाठ यांनी दिली.

सर्व संलग्नीत महाविद्यालये, विद्यार्थी व पालक यांना कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी या विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयात पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतांना विद्यापीठाद्वारे ३१ मे २०२३ रोजी तात्पुरत्या स्वरुपात प्रकाशित होणा-या संलग्नीकरण महाविद्यालये यादीतील संलग्नीत महाविद्यालय व त्यांचे अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता, महाविद्यालयात उपलब्ध पायाभूत सुविधा इत्यादी तपासूनच विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश घ्यावेत. उपरोक्त प्रमाणे यादी तपासून प्रवेश न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रवेश देणा-या संबंधित महाविद्यालय व संबंधित विद्यार्थ्यांवर राहील, याची नोंद घ्यावी.

संलग्नीकरण महाविद्यालये यादीतील संलग्नीत महाविद्यालय व त्यांचे अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता इत्यादी तपासून १५ जून २०२३ नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दयावेत. अतिरिक्त अभ्यासक्रमास किंवा मंजूर प्रवेश क्षमतापेक्षा जास्त प्रवेश दिल्यास त्यास विद्यापीठाद्वारा मान्यता देण्यात येणार नाही, करिता उपरोक्त प्रमाणे यादी तपासून प्रवेश न दिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांची राहील याची नोंद घ्यावी, असेही शैक्षणिक विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

गुणवत्ता जपण्याची विद्यापीठाची जबाबदारी : कुलगुरु

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापुर्वीच संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त अभ्यासक्रम व प्रवेशक्षमता याची यादी प्रसिध्द करण्यात आली. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी म्हटले आहे. राज्य शासनाकडून मान्यता मिळवितांना या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे शपथपत्र संस्थाचालकांच्या वतीने देण्यात येत असते त्याचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. शैक्षणिक गुणवत्ता जोपासण्याची नैतिक जबाबदारी विद्यापीठ व महाविद्यालयांवर असून या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही असेही ते म्हणाले.

 महाविद्यालयांची यादी –Provisional Affiliation College List for Academic Year 2023-24

Back to top button
error: Content is protected !!