छत्रपती संभाजीनगर
Trending

संशोधन प्रकल्पांना नव्या वर्षाच ’गिफ्ट’, ३३ प्रकल्प मंजूर, ४२ लाखांचा निधी देणार ! नववर्षांच्या पूर्वसंध्येला संशोधक प्राध्यापकांच्या प्रकल्पासाठीच्या निधीची घोषणा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.३१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने संशोधन व नवोन्मेष या क्षेत्रात नवीन प्रकल्प साकारण्यासाठी ३३ प्राध्यापकांना ४२ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली. नववर्षांच्या पूर्वसंध्येला संशोधक प्राध्यापकांच्या प्रकल्पासाठीच्या निधीची घोषणा केली.

या संदर्भात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्यासह अधिका-यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.३१) पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, वित्त व लेखाधिकारी प्रदीपकुमार जाधव, परीक्षा मंडळ संचालक डॉ.गणेश मंझा, अधिष्ठाता तथा रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलेपमेंट सेल चे संचालक डॉ.भालचंद्र वायकर, अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, आविष्कारचे समन्वयक डॉ.रत्नदीप देशमुख, डॉ.मुस्तजीब खान, डॉ.कैलास पाथ्रीकर, संयोजक एस.जी.शिंदे आदींची उपस्थिती होती.

३३ संशोधन प्रकल्पांना मंजुरी
विद्यापीठाने ’रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सेल’ स्थापन केला असून विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर हे संचालक आहेत. विद्यापीठातील ’संशोधन व नवोन्मेषण’ समाजपयोगी असवावे या हेतूने संशोधन प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. एकूण ५५ प्रस्ताव सादर झाले. यापैकी ३३ प्रकल्प मंजूर करण्यात आले असून शनिवारी दि.३१ संबंधित संशोधक प्राध्यापकांना प्रकल्प मंजूरीचे पत्र देण्यात आले, अशी माहितीही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली. या प्रकल्पनां ४२ लाख २५ हजारांचा निधी देण्यात येणार आहे.

’आविष्कार’साठी ३१० संघाची नोंदणी
यंदाच्या ’आविष्कार’मध्ये ६ विद्या शाखांतर्गत ३१० संघानी नोंदणी केली आहे. तर ५१३ संशोधक सहभागी होणार आहेत. ’आविष्कार’चे समन्वयक डॉ.रत्नदीप देशमुख आहेत. येत्या ३ व ४ जानेवारी रोजी विद्यापीठ नाटयगृह परिसरात ’आविष्कार’चे आयोजन करण्यात येणार आहे. याची संपुर्ण तयारी झाल्याची माहिती समन्वयक डॉ.रत्नदीप देशमुख यांनी दिली.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचा नूतन वर्षाचा संकल्प
महाविद्यालयांच्या स्वायत्तेवर भर
विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा वाढविणार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विभागांना शैक्षणिक स्वायतत्ता देऊन पहिले पाऊल उचलले आहे. नवीन वर्षात जास्तीत जास्त महाविद्यालयांना स्वायत्ता देण्याचा तसेच विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधा वाढविण्याचा संकल्प आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

नूतन वर्षानिमित्त विविध संकल्प ठरविले आहेत. या संदर्भात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ’स्किल बेस्ड एज्युकेशन’ व ’स्टूडंट सेंट्रिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ ही नव्या धोरणाची मुख्य संकल्पना आहे. ’अटल इन्क्यूबूशन सेंटर’च्या माध्यमातून नवउद्योजकांना सहकार्य, पीएच.डी प्रवेश प्रक्रिया (पेट) राबविणे,  विद्यापीठ परिसरासाठी इको फ्रेंडली बस, शहीद स्मारक व सिंथेटीक ट्रॅकची उभारणी आदी कामे मार्गी लावण्यात येतील, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!