छत्रपती संभाजीनगर
Trending

आता शहरातच पासपोर्टची संपूर्ण प्रक्रिया होणार; छत्रपती संभाजीनगरात दरदिवशी २०० जणांचे अर्ज स्वीकारणार !

मुंबई, पुणे व नाशिकला जाण्याची गरज पडणार नाही; छत्रपती संभाजीनगर पासपोर्ट सेवा केंद्र ऑनलाईन होण्याच्या प्रक्रियेस वेग: खासदार इम्तियाज जलील

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ : खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राला कॅम्प मोडमधून ऑनलाईन मोडमध्ये लवकर अपग्रेड करणेबाबत प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी यांना कळविले होते; त्याअनुषंगाने प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ.राजेश गवांडे यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र लवकरच ऑनलाइन मोडमध्ये अपग्रेड होणार असून प्रक्रियेस आणखी गती देण्यात येणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांना पत्राव्दारे कळवले.

सर्वसामान्य नागरिकांना व हज यात्रेकरुंना नविन अथवा पासपोर्टचे नूतनीकरण जलद प्रक्रियेसाठी अपॉइंटमेट घेण्यासाठी महिनाभर वाट पाहून मुंबई, पुणे व नाशिकला जावे लागत असे आणि विशेष म्हणजे दरदिवशी फक्त ८० नागरिकांचे अर्ज स्वीकारले जात असे. आता लवकरच थेट छत्रपती संभाजीनगर येथूनच नागरिकांना ऑनलाईन प्रक्रियेव्दारे नविन व पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज सादर करता येईल आणि दरदिवशी कमीत कमी २०० नागरिकांचे पासपोर्ट अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

खासदार इम्तियाज जलील यांनी प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमुद केले की, छत्रपती संभाजीनगर हे महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटन स्थळ असल्याने जगभरातून या शहराला भेट देणार्‍यांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राला कॅम्प मोडमधून ऑनलाइन मोडमध्ये अपग्रेड करणे आवश्यक आहे.

अपॉइंटमेंट घेण्यासाठी लोकांना महिनाभर वाट पाहावी लागते, ही अत्यंत विडंबना आहे. आणि त्यानंतरही पोलीस चौकशी अहवाल तयार होण्यास बरेच दिवस लागत आहेत. लोकांकडे त्यांच्या पासपोर्टच्या जलद प्रक्रियेसाठी मुंबई, पुणे किंवा नाशिकला जाण्याशिवाय पर्याय उरला नाही ज्यामुळे त्यांची खूप गैरसोय होत आहे.

हज २०२३ साठी अर्ज सादर करण्याची अधिसूचना लवकरच प्रकाशित केली जाईल आणि ज्या इच्छुक हज यात्रेकरूंना नवीन पासपोर्टचे नूतनीकरण करायचे आहे किंवा अर्ज करायचा आहे त्यांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी इतर जिल्हा पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये जावे लागत असेल तर छत्रपती संभाजीनगर येथे पीओपीएसके सुरू करण्याचा उद्देशच फोल ठरत आहे.

पीओपीएसके छत्रपती संभाजीनगर ऑनलाइन मोड बनवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक हार्डवेअर आणि लीज लाइन आधीपासूनच स्थापित केली गेली आहे आणि काही समस्या टीसीएस टीमद्वारे सोडवल्या जाणार आहेत. तुम्ही आवश्यक ते काम पूर्ण करुन स्कॅनिंग सुविधेसह ऑनलाइन मोड लवकरात लवकर सुरू करणेबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमूद केले होते.

Back to top button
error: Content is protected !!