छत्रपती संभाजीनगर
Trending

तिसऱ्या टप्प्यात ३१० विद्यार्थ्यांचे प्रवेश, आजपासून स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी ! ऑनलाईन नोंदणी नसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही थेट प्रवेश !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १८- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेच्या तिस-या टप्प्यात कला, वाणिज्य व आंतर विद्याशाखेतील ३१० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. विविध विभागातील रिक्त जागांवर १८ ते २४ जुलै दरम्यान थेट प्रवेश देण्यात येणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पहिल्या दोन टप्प्यात ५२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. प्रवेशित विद्यार्थ्यांची जागेवरच सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील प्रवेश प्रक्रिया शनिवारी राबविण्यात आली.

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ६६६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली. यातील ३७७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतले. महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठातील पदवीधर तसेच अन्य राज्यातील मंगळवारी पहिल्या टप्प्यात १४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या फेरीच्या तयारीचा आढावा मा . कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी घेतला. यावेळी प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, उपकुलसचिव डॉ.आय.आर.मंझा, उपपरिसर समिती सदस्य डॉ.राम चव्हाण आदींसह प्रवेश समितीचे २२ सदस्य उपस्थित होते.

समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड यांनी महत्वपूर्ण सूचना दिल्या. विद्यापीठ नाटयगृहात शनिवारी सकाळी १० ते ५ या दरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना जागेवरच प्रवेश देण्यात आले. प्रवेश प्रक्रियेसाठी स्थापना करण्यात आलेल्या २३ समित्यांची सदस्यांनी परिश्रम घेतले. डॉ.कैलास अंभुरे, डॉ.पुरुषोत्तम देशमुख व डॉ.अपर्णा अष्टपुत्रे यांनी या प्रक्रियेचे संचलन केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटयगृहात मानव्यविद्या, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र व आंतरविद्याशाखेळीत प्रवेश प्रक्रिया सोमवारी (दि.१७) सकाळी ९ वाजता सुरु झाली. सायकांळी ५ वाजेपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरु होती. प्रवेश प्रक्रियेसाठी ’युनिक’चे दिनेश कोलते, यशपाल साळवे, सचिन चव्हाण यांच्यासह पदव्यूत्तर विभागाच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. तिस-या टप्प्यात मास्टर ऑफ आर्टस (एम.ए) : अर्थशास्त्र, इंग्रजी, भुगोल, हिंदी, इतिहास, पुरातत्व विद्या, मराठी, पाली व बुध्दिझम, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, मानसशास्त्र, संस्कृत, समाजशास्त्र, ऊर्दु, स्त्री अभ्यास, लिबरल आर्टस, आजीवन शिक्षण विस्तार, योगा, संगीत, महात्मा फुले-डॉ.आंबेडकर विचारधारा या विभागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली.

’वसतिगृह, कमवा व शिका’साठी ४८२ जणांची नोंदणी
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या आदेशानूसार जागेवरच वसतिगृह व कमा व शिका योजनेचे अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले. यावेळी विद्यार्थी वसतीगृहासाठी १६२ तर विद्यार्थीनी वसतीगृहासाठी १४८ विद्यार्थ्यांनी जागेवरच अर्ज जमा केले. विद्यापीठात एकुण १५ वसतिगृह असून सुमारे दीड हजार प्रवेश क्षमता आहे.वसतिगृहसाठी एकूण ३१० विद्यार्थ्यांनी अर्ज केले तर ’कमवा व शिका’ योजनेत एकूण १८० विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करुन अर्जही दाखल केले.

आजपासून ‘स्पॉट ॲडमिशन’ प्रक्रिया
पहिल्या तीन टप्प्यात विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्यविद्या, आंतरविद्या, वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखेतील तसेच व्यायवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन प्रवेश फेरीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहेत. तिनही फेरी झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या सर्व जागांवर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १८ ते २४ जुलै या दरम्यान स्पॉट ॲडमिशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पॉट अ‍ॅडमिशनच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहेत. ‘फर्स्ट कम फर्स्ट अॅडमिशन बेसिस’वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागाच्या तासिका २६ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सर्व प्रकारचे सहकार्य : कुलगुरु
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणारे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले. देशातील सर्वाधिक संशोजक घडविणा-या आपल्या विद्यापीठात अत्यंत अन्य खर्चात शिक्षण, वसतिगृह या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही ते म्हणाले. अत्यंत सर्व सामान्य घरातील पदवीधर विद्यार्थी आपल्या विद्यापीठात पदव्यूत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यांना अत्यंत अल्पदरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कमवा व शिका योजनेतंर्गत मानधनही वाढविण्यात आले आहे. नवीन विद्यार्थ्यांने विद्यापीठात स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!