छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे अमरावती विद्यापीठाचा प्रभार !

पाचव्या विद्यापीठात कुलगुरुपदाचा मिळाला बहुमान

संभाजीनगर लाईव्ह, दि.३ : अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे डॉ.प्रमोद गोविंदराव येवले यांच्याकडे आली आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरु पदासह पाच विद्यापीठांत कुलगुरुपद सांभाळण्याचा सन्मान डॉ.येवले यांना लाभला आहे.

या संदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी, दि.तीन सदर नियुक्ती केली आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप मालखेडे यांचे २८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे सदर पद रिक्त झाले होते. दरम्यान, डॉ.प्रमोद येवले हे शनिवारी दि.चार सकाळी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

डॉ. येवले यांनी यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, कवी कुलगुरु कालीदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कुलगुरुपदाचा पदभार यशस्वीरित्या सांभाळला आहे. सध्या ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १६ जुलै २०१९ पासून कुलगुरुपदी कार्यरत आहेत.

संत गाडगेबाबा अमरावरती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाल्यानंतर पाचव्या विद्यापीठात कुलगुरुपदाचा कार्यभार सांभाळयाचा बहुमान डॉ.प्रमोद येवले यांना मिळाला. सोबतच फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाची अध्यक्षपद ही त्यांनी भुषविले आहे. महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे अमरावती विद्यापीठाचा प्रभार मिळाल्याबद्दल त्यांचे स्वागत करताना कुलसचिव डॉ.भगवान साखळे, दिलीप भरड, रवि बनकर, योगेश शिंदे यांच्यासह सहकारी उपस्थित होते.

जन्मभूमीत संधी मिळालाचा आनंद : डॉ.येवले
अमरावती परिसरातच आपले शालेय शिक्षण झाले. बालपणही याच भागात गेले. आपली जन्मभूमी असलेल्या अमरावतीतील संत गाडगेबाबा या महान संताच्या नावे असलेल्या विद्यापीठात सेवेची संधी मिळाली ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!